करोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून प्रियंका यांनी लघु-उद्योग तसेच मध्यम स्तरावरील उद्योग व्यवसाय करणारे व्यापारी, आंगणवाडी सेविका, शेतकरी, मजूर, करारावर काम करणारे कामगार यासारख्या लोकांसाठी काही सवलती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. प्रियांका यांनी पत्राच्या सुरुवातील योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या पत्रामध्ये त्यांनी गरिबांना दिलासा देता येईल अशा ११ उपाययोजना मुख्यमंत्र्यांना सुचवल्या आहेत.

प्रियांका यांनी या पत्राची अगदी भावनिक सुरुवात केली आहे. “तुमच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदाच पत्र पाठवत आहे. इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि तुम्हाला या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती देवो,” असं प्रियांका यांनी  म्हटलं आहे. पुढे लिहिताना त्या म्हणतात, “करोनामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रत्येक स्तरातील व्यक्तीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकरी, कामगार आणि मजुरांची आर्थिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. या आर्थिक संकटामध्ये मध्यम वर्गातील लोकं स्वत:च्या अस्तित्वासाठी झटत आहेत. त्यामुळेच या वर्गातील लोकांना मदत करणे आता अत्यावश्यक झालं आहे. याच संदर्भात मी काही सूचना पाठवता आहेत. अपेक्षा आहे तुमचे सरकार याकडे लक्ष देईल आणि योग्य तो निर्णय घेईल.”

प्रियांका यांनी दिलेल्या सल्ल्यांमध्ये गृहकर्जावर शून्य टक्के व्याज लावावे तसेच कर्जाचा मासिक हफ्ता (इएमआय) सहा महिन्यांसाठी पुढे ढकला असं म्हटलं आहे. तसेच सरकराने शेतमाल खरेदीची हमी शेतकऱ्यांना दावी असंही प्रियांका यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची विजेची बिलं माफ करावीत असा सल्लाही त्यांनी या पत्रामधून दिला आहे. आंगणवाडी सेविका, नोकर तसेच करारावर काम करणाऱ्यांना प्रोत्साहन निधी देऊन त्यांना आर्थिक मदत केली जावी अशी अपेक्षाही प्रियांका यांनी व्यक्त केली आहे.

“लघु तसेच कुटीर उद्योगांसंदर्भात ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. छोटे आणि संघटीत उद्योग हे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. लाखो कुटुंबांची उपजिविका या उद्योगांवर अवलंबून आहे. आज या उद्योगांवर प्रचंड ताण पडला आहे. या उद्योगांच्या उत्पादनांना असणारी मागणी आणि पुरवठा पुर्णपणे ठप्प झाला आहे. या उद्योगांशी संबंधित बँकेची कर्जे माफ केली जावीत असं निवदेन मी तुम्हाला करते,” असंही प्रियांका यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे.

कापड उद्योगाशी संबंधित विणकरांनाही सूट देण्यात यावी अशी मागणी प्रियांका यांनी केली आहे. विणकरांचे विजेचे बिल माफ करण्यात यावे तसेच विणकरांना प्रती कुटुंब १२ हजारांची मदत करावी असं प्रियांका यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. तर कुकुटपालनाशी संबंधित कामगारांनाही प्रती महिना १२ हजारांची मदत सरकारने करावी अशी अपेक्षा प्रियांका यांनी व्यक्त केली आहे.