करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंजाब सरकारने सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बस, ऑटो रिक्षा आणि टेम्पो यांच्या वाहतुकीवर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवार मध्यरात्रीपासून या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे. राज्यातील जे लोक बाहेर किंवा अन्य ठिकाणी आहेत त्यांना लवकरात लवकर आपल्या घरी पोहोचण्यासाठी उद्यापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. पंजाब सरकारने तयारीच आढावा घेण्यासाठी आज बैठक बोलावली होती. यावेळी हा निर्णय़ घेण्यात आला.

दरम्यान कोणत्याही ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी २० हून जास्त लोकांनी एकत्र येण्यावर निर्बंध आणले आहेत. आधी हा आकडा ५० ठेवण्यात आला होता. पंजाबमध्ये आतापर्यंत करोनाची दोन प्रकरणं समोर आली आहे. जर्मनी आणि इटलीचा प्रवास केलेल्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. बुधवारी त्याचा मृत्यू झाला. तर चंदिगडमध्ये करोनाची लागण झाल्याचा पहिली रुग्ण सापडला होता.

दरम्यान ४३ भारतीय अटारी सीमारेषेवरुन अमृतसरमध्ये दाखल झाले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. यापैकी २९ जणांनी दुबईला प्रवास केलेला अशून १४ जण पाकिस्तानात शिक्षण घेत आहे. त्यांचे वैद्यकीय अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आले आहेत अशी माहिती सिव्हिल सर्जन परिजीत कौर यांनी दिली आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्यांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वाढली असून आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यामुळे राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयं, जीम, स्विमिंग पूल, मंदिरं बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक राज्य सरकारसाठी महत्त्वाचा प्रश्न असून जास्तीत जास्त लोकांनी घरुन काम करा असं आवाहन करण्यात आलं आहे. पण तरीही गर्दी कमी झाली नाही तर लोकल सेवा बंद करु असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच दिला आहे.