News Flash

Coronavirus: चर्चमधील पवित्र पाणी प्यायल्याने ४६ जणांना झाली करोनाची बाधा

हे पाणी प्यायल्याने करोना होणार नाही असं सांगण्यात आलं होतं

करोनामुळे जगभरामध्ये साडेसहा हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच करोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून लोकं वाटेल ते उपाय करताना दिसत आहेत. आपल्याला करोना होऊ नये म्हणून अगदी धार्मिक विधी करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र दक्षिण कोरियामधील एका चर्चमध्ये अशाच प्रकारे करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून देण्यात आलेल्या पवित्र पाण्यामुळे ४६ जणांना करोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या वृत्ताला स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

देशाची राजधानी असणाऱ्या सेऊलच्या दक्षिणेकडील गेईयॉनगी प्रांतामधील रिव्हर ऑफ ग्रेस कम्युनिटी चर्चमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. एक ते आठ मार्च दरम्यान या चर्चमध्ये झालेल्या प्रार्थनेनंतर चर्चमधील एका महिला कर्मचाऱ्याने एका बाटलीमधून नोझल (नळीसारखा ड्रॉपर) भाविकांच्या तोंडामध्ये टाकत त्यांना मिठाचे पवित्र पाणी दिले. ही महिला भाविकांना अशाप्रकारे पवित्र पाणी देतानाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. अशाप्रकारे अनेकांच्या तोंडामध्ये टाकलेला नोझलच्या माध्यमातून ४६ जणांना करोनाची लागण झाली आहे. लागण झालेल्यांमध्ये चर्चचे मुख्य धर्मोपदेशक आणि त्याच्या पत्नीचाही समावेश आहे.

या पवित्र पाण्यामुळे करोना विषाणूंची लागण होणार नाही आणि झाली तरी त्यांचा खात्मा होईल या अंधश्रद्धेतून अनेकांनी या पाण्याचे सेवन केलं, अशी माहिती ली ही यंग या सरकारी अधिकाऱ्याने ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’शी बोलताना दिली.

या घटनेनंतर चर्चे बंद करण्यात आले असून आठ दिवसांमध्ये चर्चमध्ये प्रार्थनेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. दक्षिण कोरियामध्ये करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ८ हजार २३६ वर पोहचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2020 1:42 pm

Web Title: coronavirus saltwater spray infects 46 church goers in south korea scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मध्य प्रदेशमधील सरकार अल्पमतात, वस्तुस्थिती काँग्रेस नेत्यांनी समजून घ्यावी : शिवराजसिंह चौहान
2 Coronavirus: अफगाणिस्तान, फिलीपाईन्स आणि मलेशियाच्या प्रवाशांना भारतात प्रवेशबंदी
3 Coronavirus: आफतच झाली, काँग्रेस नेता करोना संशयिताला भेटायला गेला अन्…
Just Now!
X