मास्क न घातलेल्या ग्राहकाची सुरक्षा रक्षकाने गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मास्क न घातल्यने ग्राहकासोबत शाब्दिक चकमक झाली असता सुरक्षा रक्षकाने महिलेची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, ५ जुलै रोजी हॉकिन्स याने ५० वर्षीय जेरी ल्युईस यांची लॉस एंजेलिसमधील शहरात हत्या केली.

फिर्यादीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, जेरी ल्युईल मास्क न घालता मार्केटमध्ये आल्यानंतर दोन व्यक्तींनी त्यांच्याशी भांडण्यास सुरुवात केली. यानंतर जेरी तेथून निघून गेले. पण काही वेळाने जेव्हा ते परतले तेव्हा पुन्हा त्यांचं भांडण सुरु झालं. यावेळी हॉकिन्स याने जेरी यांच्यावर गोळीबार केला आणि तेथून निघून गेला.

करोनाचा फैलाव वाढत असल्याने कॅलिफोर्नियाच्या प्रशासनाने लोकांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे. बंद ठिकाणी जात असताना मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र अनेक ठिकाणी लोक मास्क घालण्यास नकार देत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कर्मचाऱ्यांनाही ग्राहकांना नियमांचं पालन करण्याची सक्ती करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र अनेकदा यामुळे त्यांच्यात आणि ग्राहकांमध्ये वाद होत झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मे महिन्यात अशाच पद्धतीने एका सुरक्षा रक्षकाने मास्क घालण्यास सांगितल्याने ग्राहकाने त्याच्यावर गोळीबार केला होता.

दरम्यान हॉकिन्स याच्यावर हत्येचा तसंच शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची पत्नी सबरीना कार्टर हिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही न्यायालयात आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास हॉकिन्स याला ५० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तर पत्नीला तीन वर्षांच्या जेलची शिक्षा होऊ शकते.