करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला खूप मोठा फटका बसला असून परिस्थिती चिंताजनक आहे. भारतात अनेक आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात सध्या दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून दोन हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील करोना स्थितीवर भाष्य केलं आहे. भारतामधील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगताना संकटाच्या काळात मदत केली जात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी भारतातील परिस्थिती विदारक असल्याचं म्हटलं आहे. भारतात करोना संकट गहिरं होत असतानाच जागतिक आऱोग्य संघटनेकडून हे वक्तव्य आलं आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर यांसाठी धावपळ करावी लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्राह दिल्ली, कर्नाटक अशा अनेक राज्यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले आहेत.

आणखी वाचा- मोदींची जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा; ट्विट करत म्हणाले…

“जागतिक आरोग्य संघटना जे शक्य आहे ते सर्व करत आहे. महत्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात आहे,” अशी माहिती टेड्रोस यांनी दिली आहे. करोना संकटाशी सामना करताना आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून २६०० तज्ञ भारतात पाठवण्यात आल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- भारताला दिलासा; २४ तासांत अडीच लाखांहून अधिक रुग्ण उपचारातून बरे

दरम्यान टेड्रोस यांनी जगातील करोना रुग्णसंख्या सलग ननव्या दिवशी वाढण्यावरुन चिंता व्यक्त केली. पाच महिन्यात जितके रुग्ण आढळले होते तितक्या रुग्णांची गेल्या एका आठवड्यात नोंद झाली असल्याचं सांगत त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य सांगितलं. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून भारत चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र भारतात वेगाने होणारी रुग्णवाढ चिंतेचा विषय ठरत असून जागतिक रुग्णसंख्येत मोठा वाटा उचलत आहे. भारतात सोमवारी ३ लाख ५२ हजार ९९१ नवे रुग्ण तर २८१२ मृत्यूंची नोंद झाली. ही रुग्णसंख्या जागतिक उच्चांक गाठणारी आहे.