अमेरिकेमध्ये करोनाने थैमान घातलं आहे. असं असतानाच आता अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी देशामध्ये करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढील दोन वर्ष म्हणजे २०२२ पर्यंत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी अमेरिकेमध्ये करोनामुळे दोन हजार २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये सध्या येऊ घातलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी निर्बंध उठवावेत की नाही याबद्दल मतमतांतरे असतानाच हा संशोधकांनी हा दावा केला आहे.

मंगळवारी अमेरिकेमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २८ हजार ३०० वर पोहचला आहे. देशामध्ये पसरलेल्या कोरनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सायन्स या मासिकामध्ये हार्डवर्डमधील संशोधकांनी एक लेख लिहिला आहे. “करोनावरील लस सापडेपर्यंत किंवा देशामधील अतिदक्षता विभागांची संख्या वाढत नाही तोपर्यंत देशामध्ये ठराविक काळानंतर वारंवार सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा लागेल,” असं या लेखामध्ये संशोधकांनी म्हटलं आहे. आरोग्य व्यवस्थेवर सध्या खूप ताण पडत असून हा ताण कमी करण्यासाठी अमेरिकेला इतर देशांप्रमाणे सोशल डिस्टनसिंगचा अवलंब करावा लागणार आहे असं सांगताना संशोधकांनी दक्षिण कोरिया, सिंगापूरसारख्या देशांचे उदाहरण दिलं आहे. सोशल डिस्टनसिंगच्या माध्यमातूनच करोनासंदर्भातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटाइनसंदर्भात योग्य निर्णय घेणे शक्य होणार असल्याचेही संशोधकांनी म्हटलं आहे.

अशाप्रकारे वारंवार सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा लागल्याने अर्थव्यवस्थेबरोबर शिक्षण क्षेत्रावर परिणाम होतील आणि याचे सामाजिक परिणामही जाणवतील असंही या संशोधकांनी म्हटलं आहे. इतकचं नाही तर करोनाचा संसर्ग आणि करोनाची लागण झालेले रुग्ण पुढील चार वर्षे म्हणजे २०२४ पर्यंत अढळत राहतील अशी शक्यताही संशोधकांनी व्यक्त केली आहे. काही संशोधनांनुसार दर हिवाळ्यामध्ये करोनाचा नव्याने संसर्ग होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जगभरातील २० लाखांहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर एक लाख ३० हजारहून अधिक जणांना आतापर्यंत कोरनामुळे मृत्यू झाला आहे. असं असलं तरी अद्याप करोना हा सर्वात घातक ठरेल अशा स्तरावर पोहचलेला नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. चीनमधून जगभरामध्ये फैलाव झालेल्या करोनाचे अमेरिका हा नवीन केंद्रबिंदू ठरला आहे. अमेरिकेमध्ये करोनाचा वेगाने फैलाव होताना दिसत असून येथे मागील काही दिवसांपासून सरासरी १५०० हून अधिक जणांचा रोज मृत्यू होत आहे.