भारतामधील करोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक घातक ठरल्याचे आकडेवारीवरुन आणि सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे. अनेक ठिकाणी आरोग्यव्यवस्था कोलमडून पडल्याचं चित्र दिसत आहे. ऑक्सिजन बेड, औषधे आणि रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत आहे. उत्तर प्रदेशमधील आग्र्यामधील बृजमध्येही करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. करोना रुग्णांची आणि करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या इतकी आहे की अंत्यसंस्कार करण्यासाठी पाच ते सहा तास वाट पहावी लागत आहे. इतकच नाही तर रुग्णवाहिकाही कमी पडू लागल्या आहे. रुग्णवाहिकांची संख्या कमी असल्याने सर्वसामान्यांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासासंदर्भातील एका फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. करोनामुळे रुग्णवाहिकांची कमी असल्याने एका मुलाला मरण पावलेल्या वडिलांची तिरडी गाडीवर बांधून त्यांचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये न्यावा लागला. हे दृष्यपासून स्मशानभूमीमधील अनेकांना अश्रू अनावर झाले.

हा मुलगा आपल्या वडीलांचं पार्थिव घेऊन स्मशानात पोहचल्यानंतर त्याला तिथे काही तास थांबावे लागले. अंत्यविधीसाठी स्मशानात क्रमांक लावून काही तास थांबल्यानंतर या मुलाच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही आवस्था पाहून स्मशानभूमितील लोकांनाही अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> हृदयद्रावक! बेड नसल्याने तीन रुग्णालयांनी दिला नकार, रिक्षामध्ये पत्नी तोंडाने ऑक्सिजन देत राहिली पण…

आग्रा येथील परिस्थिती चिंताजनक

आग्रा येथे करोनाबाधितांची संख्या ६०० हून अधिक झाली आहे. मागील ९ दिवसांमध्ये येथे करोनामुळे ३५ रुग्णांचा जीव गेलाय. मैनापुरी जिल्ह्यात ८, फिरोजबादमध्ये दोन, मथुरात ४, एटामध्ये सात, कासगंजमध्ये दोन आणि आग्र्यात एका दिवसात पाच जणांचा मृत्यू झालाय. आग्र्यातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करुन घेतले जात नाहीय. त्यामुळेच फिरोजाबाद, मथुरा येथील रुग्णालयांमध्ये गंभीर अवस्था असणाऱ्या रुग्णांना पाठवलं जात आहे. यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. मैनापुरीमध्ये ३६९, एटीमध्ये २३७, मथुरात १९०, फिरोजाबादमध्ये ८० आणि कासगंजमध्ये ४२ नवे रुग्ण आढळून आलेत. असं असतानाही स्थानिक राजकारणी मात्र या परिस्थितीसाठी एकमेकांना दोष देताना दिसत आहेत.