चीनमधून जगभरामध्ये प्रादुर्भाव झालेल्या करोना विषाणुने आता युरोपियन देशांमध्ये थैमान घातलं आहे. युरोपमधील इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशांना करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे. स्पेनमध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या चार हजारांहून अधिक झाली आहे. तर संसर्ग झालेल्या रुग्णांची स्पेनमधील संख्या ५६ हजारहून अधिक आहे. त्यातच आता स्पेनच्या उपपंतप्रधान कारमेल कॅल्वो यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. कॅल्वो याच्या करोनाच चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कॅल्वो यांची पहिली करोना चाचणी मंगळवारी घेण्यात आली होती. त्यामध्ये त्यांना करोना झाल्याचे अढळून आलं नाही. त्यांनंतर बुधवारी घेण्यात आलेल्या दुसऱ्या चाचणीमध्ये त्यांना करोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्याल सूक्ष्म लक्षणं दिसून आली. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. स्पेन सरकारने जारी केलेल्या पत्रकानुसार कॅल्वो यांची प्रकृती स्थिर आहे. त्या ६२ वर्षांच्या आहेत.

स्पेनमध्ये मागील २४ तासांमध्ये ६५५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या ५६ हजार १८८ इतकी आहे. त्यापैकी ३१ हजार ९१२ जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये करोनाचा संसर्गामुळे प्रकृती चिंताजनक असल्याने तीन हजार ६७९ जण आयसीयुमध्ये भरती असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. स्पेनमधील ७ हजार १५ रुग्ण आजारामधून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत करोनामुळे चार हजार ८९ मृत्यू झाले आहेत. हा आकडा चीनमध्ये झालेल्या मृत्यूच्या आकड्यांहूनही अधिक आहे. करोनामुळे स्पेनपेक्षा अधिक मृत्यू केवळ इटलीत झाले आहेत.

मागील तीन आठवड्यांपासून स्पेनमध्ये करोना विषाणूचा प्रसार वेगाने झाला आहे. त्यामुळेच मागील तीन आठवड्यांपासून इटलीपाठोपाठ स्पेननेही प्रवासबंदीसह अन्य कठोर निर्बंध जारी केले. स्पेनमध्ये १५ मार्च रोजी दोन आठवडय़ांची आणीबाणी जाहीर करण्यात आली.  स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सँचेझ यांच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्पेनमध्ये अनेक दिवस सगळा देश बंद ठेवला होता. सँचेझ यांचे सोशालिस्ट व विरोधी युनायटेड वुई कॅन यांच्यातील संघर्ष करोनाग्रस्त परिस्थितीतही चालूच आहे त्यामुळे सरकारला निर्णय घेण्यास विलंब लागत असल्याची टीका केली जात आहे. फक्त आरोग्य हा अग्रक्रम राहील तसेच अन्न व औषधे खरेदी, लहान मुले  व तरुणांची शुश्रुषा, बँक व्यवहार  यासाठी घरातून बाहेर पडता येणार नाही. सर्व  रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, शाळा, विद्यापीठे, अनावश्यक किरकोळ विक्री केंद्रे बंद  करण्यात येत आहे, असं स्पेनच्या पंतप्रधानांनी विरोधी पक्षाबरोबर झालेल्या सात तासांच्या बैठकीनंतर स्पष्ट केलं होतं. जानेवारीत स्पेनमध्ये पहिला रुग्ण सापडला होता.