जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशात तब्बल 5 हजार 609 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 132 जणांचा करोनाने बळी घेतला आहे.

देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 1 लाख 12 हजार 359 वर पोहचली आहे. या मध्ये सध्या उपचार सुरू असलेले 63 हजार 624 रुग्ण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 435 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यता आलेली आहे.

जगभरात अन्य देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्राला यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी केला गेला. एक लाख लोकसंख्येमागे जगभरात 62.3 करोना रुग्ण आढळले पण भारतात ही संख्या केवळ 7.9 इतकीच होती, असे केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.

भारतात वैद्यकीय हाताळणी प्रभावीपणे केली जात असल्याने एक लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण फक्त 0.2 टक्के आहे. जगभरातील सरासरी4.2 टक्के असल्याचे अगरवाल म्हणाले. उपचार होत असलेल्या रुग्णांपैकी 2.9  टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून 3 टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. 0.45  रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छसावर ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.