करोनावर मात केलेल्या सूरतमधील एका उद्योजकाने आपल्या ऑफिसचं ८५ बेडच्या कोविड रुग्णालयात रुपांतर केलं आहे. या रुग्णालयात गरिबांना मोफत उपचार दिले जाणार आहेत. करोनाचे रुग्ण वाढत अलल्याने सध्या सरकारी रुग्णालयांवर प्रचंड भार आहे. कादर शेख करोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल झाले होते. २० दिवस त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. यावेळी रुग्णालयाने लावलेलं बिल पाहून कादर शेख यांना धक्काच बसला.

“रुग्णालयाकडून आकारण्यात आलेलं बिल प्रचंड होतं. गरीबांना उपचारासाठी इतका खर्च कसा परवडणार? त्यामुळेच मी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. तसंच या जीवघेण्या व्हायसरविरोधात लढा देण्यासाठी आपलं योगदान देण्याचं ठरवलं,” असं कादर शेख यांनी एफपीशी बोलताना सांगितलं आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कादर शेख यांनी स्थानिक प्रशासनाकडे आपल्या ३० हजार स्क्वेअर फुटांच्या कार्यालयाचं कोविड रुग्णालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. कर्मचारी, वैद्यकीय उपपकरणं आणि औषधांचा पुरवठा या सगळ्याची जबाबदारी सरकार घेतं. तर कादर शेख यांनी आपल्या खिशातील पैसे खर्च करत बेड आणले. वीजेचा खर्चही तेच उचलत आहेत.

या रुग्णालयात कोणत्याही धर्म, जातीची व्यक्ती दाखल होऊ शकते असं कादर शेख यांनी सांगितलं आहे. करोनाने भारतात थैमान घातलेलं असून रुग्णांची संख्या १५ लाखांच्या पुढे गेले असून ३५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.