News Flash

ना लॉकडाउन…ना सोशल डिस्टन्सिंग, करोनाशी लढण्याची ‘ही’ आहे स्वीडनची स्ट्रॅटेजी

करोनाचं संकट आल्यानंतर एकीकडे शेजारी देशांनी सीमा, शाळा, हॉटेल, उद्योग बंद ठेवले असताना स्वीडनने मात्र याउलट मार्ग निवडला आहे

[Photo Courtesy: China Daily Global]

करोनाचं संकट आल्यानंतर एकीकडे शेजारी देशांनी सीमा, शाळा, हॉटेल, उद्योग बंद ठेवले असताना स्वीडनने मात्र याउलट मार्ग निवडला आहे. आपल्या देशातील लोकांचं आयुष्य नेहमीप्रमाणे सर्वसामान्य कसं राहील यासाठी स्वीडन प्रयत्न करत आहेत. स्वीडनने ‘हर्ड इम्युनिटी’ची योजना आखली आहे. यानुसार लोकांमध्ये रोग प्रतिकारकशक्ती निर्माण करण्यासाठी व्हायरसचा फैलाव होऊ द्यायचा. मात्र यामधून हाय रिस्क असणारे म्हणजेच वृद्ध लोकांना वगळायचं. स्वीडनची ही योजना सध्या वादग्रस्त ठरत असून चर्चेचा विषय आहे. स्वीडनमधील साथीच्या रोगाच्या विशेषज्ञांनी मात्र आपली ही योजना काम करत असून लवकरच ‘हर्ड इम्युनिटी’ योजना राजधानी स्टॉकहोल्म येथे राबवली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

युरोपीय देश स्वीडनमध्ये करोना व्हायरसमुळे आतापर्यंत १९३७ लोकांचा मृत्यू झाला असून १५ हजार ३२२ लोकांना लागण झाली आहे. मात्र यानंतरही स्वीडनच्या आरोग्य विभागातील साथीचे रोग विशेषज्ञ डॉक्टर एंडर्स टेगनेल यांनी आपला देश मे महिन्यापर्यंत करोना व्हायरसविरोधात रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच हर्ड इम्युनिटी प्राप्त करण्यात यश मिळवेल असा दावा केला आहे.

स्वीडन सरकार पूर्पणणे लॉकडाउनच्या विरोधात आहे. दरम्यान देशातील किती लोकांना करोनाची लागण झाली आहे यासाठी युद्ध स्तरावर चाचण्या केल्या जात आहेत. “स्वीडनच्या अनेक भागांमध्ये आम्हाला हर्ड इम्युनिटीचा प्रभाव होताना दिसत आहे. आगामी काळात याचा मोठ्या स्तरावर परिणाम झालेला पहायला मिळेल. राजधानी स्टॉकहोममधील जनता पुढील महिन्यात हर्ड कम्युनिटी प्राप्त करु शकणार आहे,” अशी माहिती डॉक्टर एंडर्स टेगनेल यांनी दिली आहे. मात्र दुर्दैवाने वृद्धाश्रमांमध्ये करोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक असून आम्ही त्याची कारणं तपासत असल्याचं डॉक्टर एंडर्स टेगनेल यांनी सांगितलं आहे.

स्वीडनमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या शेजारील देश डेन्मार्क (८१०८ प्रकरणं आणि ३७० मृत्यू) आणि फिनलँड (४००० प्रकरणं आणि १४१ मृत्यू) यांच्यापेक्षाही जास्त आहे. स्वीडनमध्ये मात्र १९३७ मृत्यूंची नोंद झाली आहे. सुरुवातीला स्वीडनमध्ये फक्त रुग्णालयात येणाऱ्यांची तपासणी केली जात होती. पण आता मात्र त्यांनी मोठ्या प्रमाणात तपासणी सुरु केली आहे. करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत नसल्यानेच मोठ्या प्रमाणात चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. स्वीडनमध्ये आठवड्याला जवळपास २० हजार लोकांची तपासणी होत असून लवकरच काही आठवड्यात एक लाखांचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न असेल असं डॉक्टर एंडर्स टेगनेल यांनी सांगितलं आहे.

हर्ड इम्युनिटी म्हणजे काय ?
जेव्हा माणूस किंवा प्राण्यांमधील लोकसंख्येचा एक मोठा भाग कोणत्याही संसर्गजन्य रोगाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती मिळवतो ज्यामुळे त्याचा प्रादुर्भाव कमी होतो तेव्हा त्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात. याला हर्ड इम्युनिटी किंवा ग्रुप प्रोटेक्शनही म्हणतात. वेळेसोबत विषाणूंविरोधात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते तेव्हा शरीरावर विषाणूंचा कोणताही प्रभाव होत नाही. यामुळे वेगवेगळ्या रोगांचा प्रसार रोखता येतो. काही रोग आणि विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतात. ही साखळी जेव्हा तुटते तेव्हा अधिकाधिक लोक या रोगापासून वाचतात. कारण त्याचा फैलाव थांबलेला असतो. वैज्ञानिकांचा दावा आहे की, जेव्हा लोकसंख्येच्या ४० टक्के लोक हर्ड इम्युनिटी मिळवतात तेव्हा विषाणूंचा प्रभाव पूर्णपणे संपतो. पण अनेक विषाणू किंवा रोगांना आळा घालण्यासाठी ८० ते ९५ टक्के लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी असणं गरजेचं मानण्यात आलं आहे.

ज्येष्ठ नागरिकांना मोजावी लागत आहे किंमत
करोनाचे नवे रुग्ण आढळत नसले तरी हर्ड इम्युनिटी वादग्रस्त ठरत आहे. व्हायरसचा फैलाव होऊ दिल्याने वृद्द नागरिक आणि आधीच अनेक रोगांचा सामना करणाऱ्यांच्या जीवाला धोका पोहोचत असून त्यांची प्रकृती जास्त ढासळण्याचा किंवा मृत्यू होण्याचाही धोका आहे.

हर्ड इम्युनिटीच्या योजनेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं डॉक्टर एंडर्स टेगनेल सांगतात. यावेळी त्यांनी अनेक देशांनी जी एक्झिट योजना वापरली आहे ती स्वीडनशी मिळती जुळती असल्याचं म्हटलं आहे.

स्वीडन सरकार डॉक्टर एंडर्स टेगनेल आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे वाटचाल करत आहेत. एकीकडे अनेक देशांनी लॉकडाउन जाहीर केला असताना स्वीडन मात्र देशातील नागरिक योग्य काळजी घेतील असा विश्वास व्यक्त करत आहे. स्वीडन सरकारने शक्य असेल त्यांनी घरुन काम करत विनाकारण प्रवास टाळावा असा सल्ला दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात येऊ नका असंही सांगण्यात आलं आहे. एकीकडे रेस्तराँ, बार, कॅफे, नाइट क्लबमध्ये ठराविक अंतरावर बसण्याची व्यवस्था केली असून ५० हून जास्त लोकांच्या एकत्रित येण्यावर बंदी आहे. दुसरीकडे शाळा सुरु ठेवण्यात आली असून सर्वसामान्यांचं आयुष्य सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न आहे. करोनाचा प्रसार नेमका किती झाला आहे याची माहिती मिळवण्यासाठीच मोठ्या प्रमाणात चाचणी केली जात असल्याचं डॉक्टर एंडर्स टेगनेल यांनी सागंतिलं आहे. देशातील काही भागांमध्ये करोनाचा अजिबात प्रभाव नसणं आश्चर्यकारक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 5:15 pm

Web Title: coronavirus sweden resisted lockdown building heard immunity sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Good news: मागच्या १४ दिवसात ७८ जिल्ह्यांमध्ये करोनाचा एकही नवा रुग्ण नाही
2 वर्क फ्रॉम होमसाठी ३ मे पर्यंत मोफत इंटरनेट?; तो व्हायरल मेसेज खरा की खोटा जाणून घ्या
3 Coronavirus: १५ ऑक्टोबरपर्यंत हॉटेल, रेस्तराँ, रिसॉर्ट बंद?; जाणून घ्या त्या व्हायरल मेसेजमागील सत्य काय
Just Now!
X