करोनामुळे देशामध्ये २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्याने अनेक पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. मात्र निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या काही पर्यटनस्थळांवरील रस्त्यांवर आता जंगली प्राणी फिरतानाच्या घटना समोर येत आहेत. उटीसारखे ठिकाण असणाऱ्या कुन्नूर तालुक्यातील दुरुमुल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये स्थानिकांनी मागील काही दिवसांमध्ये रस्त्यांवर अस्वल आणि ब्लॅक पँथर पाहिल्याचा दावा केला आहे. या परिसरापासून हाकेच्या अंतरावर संरक्षित वनश्रेत्र आहे. त्यामुळेच या भागामध्ये बिबट्याही असण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी लोकवस्ती असणाऱ्या भागातील सस्त्यांवर अस्वल फिरताना दिले होते. या भागामधील रस्ते सध्या लॉकडाउनमुळे रिकामे असून संध्याकाळच्या वेळी अत्यंत कमी वर्दळ असते. त्यामुळेच जंगलामधील प्राण्यांनी लोकवस्तीमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. या भागाच्या जवळ असणाऱ्या वनक्षेत्रात बिबट्यांचा आवास आहे. याच भागांमध्ये असणाऱ्या गरांजली, मेल-गरांजली आणि बंदिशोला परिसरामध्येही जंगली प्राणी रस्त्यांवर दिसून आले आहेत. कुन्नूर आणि उटी दरम्यान असणाऱ्या डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणत प्राणी आहेत. त्यामुळेच आता पर्यटकांची संख्या कमी झाल्याने हे प्राणी शहरी भागांमध्ये दिसू लागले आहेत.

गरांजली येथील स्थानिक रहिवाशी असणाऱ्या शिवकुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, “रस्त्यांवरील वाहतूक अगदीच कमी झाली आहे. लब्स नोज, डॉल्फिन्स नोज यासारखी लोकप्रिय पर्यटनस्थळे दहा दिवसांहून अधिक काळापासून बंद आहेत. त्यामुळेच या भागात शांतता असते. याच कारणामुळे आता लोकवस्ती असणाऱ्या भागामध्ये जंगली प्राणी येऊ लागले आहेत.”

काही दिवसांपूर्वी या भागातील रस्त्यांवर ब्लॅक पँथर दिसला होता. शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये हा बँक पँथर रस्त्यावर फिरतानाचे क्षण कैद झाले आहेत. “पर्यटक नसल्याने या डोंगराळ भागांमध्ये जंगली प्राणी मुक्तपणे भटक आहेत,” असं शिवकुमार म्हणाले.