करोनाच्या संकटाच्या काळामध्ये पगारकपातीचा फटका आता टाटा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही बसण्याची दाट शक्यता आहे. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील टाटा समुहालाही इतर कंपन्यांप्रमाणे मोठा आर्थिक फटका बसला आहे. टाटा समुहातील कंपन्यांपैकी प्रमुख कंपन्या असणाऱ्या इंडियन हॉटेल्स, विस्तारा एअरलाइन्स, टाटा मोटर्स या कंपन्यांना सर्वात मोठा फटका बसला आहे. पर्यटन आणि वाहन निर्मिती श्रेत्रातील या दिग्गज कंपन्यांचे आर्थिक गणित लॉकडाउनमुळे कोलमडले आहे. असं असलं तरी दुसरीकडे टाटा समुहाच्या मालकीच्याच टाटा पॉवर तसेच टाटा कम्युनिकेशन्ससारख्या कंपन्यांना लॉकडाउनचा थोड्या फार प्रमाणात फायदा झाला आहे. अनेकजण घरीच असल्याचे विजेची मागणी तसेच सतत संपर्कात राहण्याच्या सवयीमुळे या दोन कंपन्यांना फायदा झाला आहे. मात्र या कंपन्यांच्या फायद्याच्या तुलनेत इतर कंपन्यांना झालेला तोटा मोठा असल्याने सांगितले जात असल्याने लवकरच टाटा समुह मोठा धोरणात्मक निर्णय घेऊ शकते, असं वृत्त ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

देशातील पहिले लक्झरी हॉटेल असणाऱ्या मुंबईतील ताजमहल पॅलेची मालकी असणाऱ्या इंडियन हॉटेल्सच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका तिमाहीनंतर वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात केली जाऊ शकते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या पुनीत चटवाल यांनी एक इमेल पाठवला आहे. “आपल्याला प्रत्येक परिस्थितीचा अभ्यास करुनच निर्णय घ्यावा लागणार आहे. काही कठीण निर्णयही घ्यावे लागतील,” असं चटवाल यांनी मेलमध्ये नमूद केलं आहे. चटवाल यांनी कंपनीच्या आर्थिक तसेच कामकाज (ऑप्रेशन्स) संदर्भात सतत माहिती घेतली जात आहे. कोणत्याही प्रकारच्या नवीन गोष्टी आणि नोकरीवर नव्याने लोकं घेण्याच्या निर्णयांवर तात्पुरती बंदी घातली जाऊ शकते, असे संकेतही चटवाल यांनी दिले आहेत.

टाटा ग्रुपच्याच मालकीच्या विस्तारा एअरलाइन्सने आपल्या ३० टक्के कर्मचाऱ्यांना एप्रिले ते जून या कालावधीमध्ये काही दिवसांसाठी बिनपगारी सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. खर्चामध्ये कपात करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समजते. देशातील हॉटेल उद्योग आणि हवाई श्रेत्रातील कंपन्यांना लॉकडाउनमुळे एक लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. विस्ताराला झालेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीला आर्थिक संकटातून वर काढण्यासाठी टाटा सन्सने आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकचं नाही तर टाटा समुहाची सर्वाधिक नफ्यात राहणारी कंपनी म्हणजेच टीसीएसने आपल्या साडेचार लाख कर्मचाऱ्यांची या वर्षीची पगारवाढ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समुहानेही आपल्या हायड्रोकार्बन उद्योगातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा ५० टक्के पगार कापण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँक, स्पाइसजेट, ओयो, इंडिगोबरोबर अनेक दिग्गज कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कठोर असला तरी सध्य स्थितीत तो घेणे गरजेचे असल्याचे अनेक कंपन्यांनी म्हटलं आहे.