अमेरिकेमध्ये करोनाने थैमान घातलं आहे. येथे करोनामुळे दहा हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण अमेरिकेमध्ये भीतीचे वातावरण असतानाच टेक्सास राज्यातील पोलिसांना मागील काही दिवसांपासून एका गोष्टीची चिंता होती. टेक्सासमधील एका १८ वर्षाच्या मुलीचा शोध घेत होते. या मुलीने तिच्या स्नॅपचॅट अकाऊंटवरुन काही व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यामध्ये तिने ‘मी संपूर्ण टेक्सास राज्यामध्ये मुद्दाम करोना परसरवणार’ अशी धमकी दिली होती. दोन ते तीन दिवस सतत प्रयत्न केल्यानंतर अखेर मंगळवारी पोलिसांनी या मुलीली दहशतवाद पसरवल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

डॅलसजवळील कॅरोल्टोन पोलिसांनी या मुलीची ओळख पटवली असून तिचे नाव लॉरेन मर्डीगा असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे वृत्त एनबीसी न्यूजने दिले आहे. या मुलीवर धमकी देऊन समाजामध्ये भिती निर्माण केल्याप्रकरणी दहशतवादी कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“लॉरेन ही राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी धोका ठरु शकते याबद्दल आमच्याकडे अगदी ठोस माहिती नाहीय. मात्र तिने सोशल नेटवर्किंग केलेल्या पोस्ट आम्ही गांभीर्याने घेतल्या असून तपास सुरु केल्याचे,” पत्रक पोलिसांनी रविवारी जारी केलं होतं. लॉरेनने पोस्ट केलेले व्हिडिओ कधी आणि कुठे चित्रित करण्यात आले आहेत यासंदर्भातील माहिती पोलिसांकडे नसल्याचे पोलीस खात्याच्या प्रवक्त्या जोलीनी डीव्हीटो यांनी दिली होती. “अनेकांनी या व्हिडिओ पोस्टवर पोलिसांना टॅग करत या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती सोशल मिडियावर केली”, असं जोलीनी यांनी स्पष्ट केलं.

व्हायरल झालेल्या व्हिडिओपैकी एक व्हिडिओ हा करोना चाचणीसाठी उभारण्यात आलेल्या ड्राइव्ह थ्रू केंद्रावर चित्रित करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. या व्हिडिओमध्ये वैद्यकीय अधिकारी लॉरेनला तू घरी जावे आणि चाचणीचा निकाल येईपर्यंत वाट बघावीस असं सांगताना दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ही मुलगी दुकानात वस्तू खरेदी करताना दिसत आहे.

“मी आता वॉलमार्टमध्ये आहे. मी सर्वांमध्ये करोनाचा संसर्ग पसरवणार आहे. कारण मी जाणार असेल तर सर्वांना घेऊन जाणार आहे,” असं लॉरेन सांगता दिसत आहे. तिसऱ्या व्हिडिओमध्ये लॉरेन गाडीमध्ये बसल्याचे दिसत असून ती कॅमेरावर खोकते. “तुम्हाला करोना व्हायरलची लागण करुन घ्यायची असेल, मरायचं असेल तर मला कॉल करा. मी तुम्हाला भेटायला येईल आणि तुमचं आयुष्य कमी करण्यास मदत करेन,” असं लॉरेन सांगता अन्य एका व्हिडिओत दिसत आहे.

पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या मुलीच्या घरी छापा टाकून तिला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला होता. या मुलीच्या कुटुंबाला तिच्या सध्याच्या ठिकाणाबद्दल काहीच माहिती नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. मंगळवारी पोलिसांनी या मुलीला अटक केली. या मुलीला करोना नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या मुलीला २० हजार डॉलरच्या (अंदाजे १५ लाख २५ हजार रुपये) जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या मुलीला २१ दिवस विलगीकरणामध्ये राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.