देशभरामध्ये कोरनाचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच अनेक उद्योगपतींनी आणि सेलिब्रिटीजने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मदत निधी दिला आहे. टाटा ग्रुप्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनीही ५०० कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी केली होती. त्यानंतर लगेचच टाटा सन्सनेही एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. या आर्थिक मदतीबरोबर टाटा ग्रुप्सच्या माध्यमातून डॉक्टरांच्या जेवणाची आणि राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. त्यामुळेच इंटरनेटवर रतन टाटा सध्या चर्चेचा विषय आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने एक मेसेज फॉरवर्ड केला जात आहे. याच मेसेजवर रतन टाटांनीच थेट ट्विटवरुन स्पष्टीकरण दिलं आहे.

काय आहे हा व्हायरल मेसेज

रतन टाटांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या नावाने फिरत असणारा आणि त्यांनीच हा मजकूर लिहिल्याचा दावा करणारं एक कात्रण दिसत आहे. “करोनामुळे अर्थव्यवस्थेची मोठी पडझड होईल असं तज्ज्ञ सांगत आहे. मला हे तज्ज्ञ कोण आहेत याबद्दल नक्की माहिती नाही. मात्र या तज्ज्ञांना मानवाची इच्छाशक्ती आणि प्रेरणा देणाऱ्या शक्तीबद्दल नक्कीच ठाऊक नसेल असं मला वाटतं. तज्ज्ञांवर विश्वास ठेवायचा झाला तर दुसऱ्या महायुद्धनंतर जपानला काहीच भविष्य नव्हतं. मात्र जपानने अवघ्या तीन दशकांमध्ये अमेरिकेलाही उद्योगांच्या शर्यतीमध्ये रडवल्याचं चित्र पहायला मिळालं. तज्ज्ञांवर विश्वास ठेवायचा झाल्यास अरबांनी इस्रायलला जगाच्या नकाशावरुन मिटवून टाकायला हवं होतं. पण तसं झालं नाही. तज्ज्ञांवर विश्वास ठेवायचा झाला तर आपण १९८३ च्या विश्वचषकामध्ये कुठेच नव्हतो,” असे अनेक संदर्भ देणारा लेख रतन टाटांनी लिहिल्याचे म्हटले आहे. या लेखाच्या शेवटी, “करोनाचे संकटही असेच आहे. मला याबद्दल काहीच शंका नाही. आपण करोनाला नक्कीच हरवू. भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल,” असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

टाटांचे स्पष्टीकरण

मात्र हा मजकूर आपण लिहिलेला नाही किंवा मी असं कुठेही म्हणालेलो नाही असं रतन टाटा यांनी ट्विट करुन स्पष्ट केलं आहे. “या पोस्टमधील दिसणाऱ्या गोष्टी मी कधीच म्हणालेलो किंवा लिहिलेल्या नाहीत. व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मिडियावर होणाऱ्या माहिती तपासून पाहा अशी विनंती मी तुम्हाला करतो. मला काही बोलायचं किंवा सांगायचं असेल तर मी ते माझ्या अधिकृत माध्यमांच्या मदतीने सांगेन. तुम्ही सुरक्षित असाल अशी अपेक्षा करतो. काळजी घ्या,” असं ट्विट रतन टाटांनी केलं आहे.

नक्की वाचा >> ‘टाटा ग्रुप’कडून डॉक्टरांना फाइव्ह स्टार ट्रीटमेंट! मुंबईतील पाच पंचतारांकित हॉटेलमध्ये केली राहण्याची सोय

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये करोना आणि त्यासंदर्भातील बरीचशी खोटी माहिती समाजमाध्यमांमधून व्हायरल केली जात आहे. मात्र खोटी माहिती पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून अफवा पसरवणे प्रकरणी राज्यात १३५ गुन्हे दाखल झाले आहेत.