चीनमध्ये करोना व्हायरस या नव्या विषाणूची बाधा झाल्यापासून अवघ्या तीन महिन्यांमध्ये जगामध्ये उत्पात घडला आहे. ही जागतिक साथ असल्याचे जाहीर करण्यात आले आणि न्यू यॉर्कपासून ते नवी दिल्लीपर्यंत जगातील अर्ध्यापेक्षा जास्त जनतेचं जीवनमान ठप्प झालं. जागतिक मंदीची लाट येते की काय भीतीनं अनेक देशांनी आर्थिक पॅकेजेस जाहीर केली.

२०२० या वर्षाच्या सुरुवातीलाच करोनानं जगभर धुमाकूळ घातला असून त्याची ही टाइमलाइन:

 

नवीन करोना व्हायरसचा शोध

८ जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) वुहान या चीनमधील शहरात न्यूमोनियाच्या काही केसेस आढळल्या आहेत ज्यामध्ये श्वसनयंत्रणेवर ताण पडतो. डिसेंबरमध्ये ५९ जणांना हा आजार झाल्याचे जाहीर करण्यात आले. वुहान बाजारात प्राण्यांचं मांस विकणाऱ्या अनेक विक्रेत्यांना या आजारानं ग्रासल्याचं समोर आलं.

सार्सच्या आठवणी

२००२-०३ मध्ये ३० देशांमध्ये जवळपास ८०० लोकांचे बळी घेणाऱ्या सार्सच्या (सीव्हीअर अक्युट रिस्पायरेटरी सिंड्रोम) आठवणी जागा झाल्या. चीनमध्ये ११ जानेवारी रोजी या विषाणूमुळे एक मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आणि या संपूर्ण प्रदेशात तसेच चीनच्या मुख्य भूमीत या विषाणूचा प्रसार झाल्याचे समोर आले. जानेवारीच्या अखेरीस युरोपमध्ये पहिली केस फ्रान्समध्ये आढळली. ही बाधा अशांना झालेली जे चीनमधून आले होते. एकप्रकारचा फ्लू असं वर्णन केलेला हा आजार वृद्ध किंवा ज्यांची प्रकृती ठीक नाही अशांसाठी धोकादायक असल्याचे यावेळी सांगण्यात येत होते.

चीनमध्ये लॉकडाउन

या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चीन २५ जानेवारी रोजी टोकाचं पाउल उचलतं. वुहान या संपूर्ण शहरात लॉकडाउन करण्यात येतं त्यापाठोपाठ संपूर्ण हुबेई प्रांत लॉकडाउन करण्यात येतो आणि तब्बल ५.६ कोटी चिनी जनतेचा उर्वरीत जगापासून संपर्क तोडण्यात येतो. अन्य देशही चीनमधून आपापल्या नागरिकांना परत आणण्याचे व त्यांचे विलगीकरण करण्याचे पाउल उचलतात. जानेवारीच्या अखेरापर्यंत चीनमध्ये ६,००० जणांना या विषाणूची लागण झाल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात येते. करोना प्रकारातल्या नव्या विषाणूने सार्समुळे झालेल्या केसेसना मागे टाकल्याचे स्पष्ट होते. जागतिक आरोग्य संघटना जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करते, परंतु आंतरराष्ट्रीय व्यापार व प्रवासावर मात्र निर्बंध सुचवत नाही.

प्रवाशांची कोंडी

परंतु आतंरराष्ट्रीय विमान वाहतूक कंपन्या चीनमध्ये जाणाऱ्या व चीनमधून येणाऱ्या विमानांची संख्या कमी करण्यास सुरूवात करतात. क्रूझ लाइनर्सवर विषाणूच्या बाधा झालेल्या केसेस आढळल्यावर हजारोजणं अडकून पडतात. जपानच्या किनारी असलेल्या क्रूझवरील ३,७०० पेक्षा जास्त जणांना ५ फेब्रुवारी पासून विलग करण्यात येतं. काही आठवड्यातच या क्रूझवरील ७०० जणांना लागण झाल्याचे आढळते.

किटकाचा संबंध समोर येतो

फेब्रुवारीमध्ये चीनमधील संशोधकांना पँगोलिन या किटकाचा संबंध या आजाराशी असावा याचा शोध लागतो. या किटकामुळे विषाणूचा प्रसार वटवाघूळ ते माणूस असा झाल्याचे लक्षात येते. ली वेनलिंग या वुहानमधील डॉक्टरचा या आजारानं मृत्यू होतो आणि चीनमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण होतो. वेनलिंग अशा मोजक्या लोकांपैकी होते ज्यांनी डिसेंबरमध्येच धोक्याचा इशारा दिला होता, परंतु त्यांना नुसतंच गप्प करण्यात नाही आलं तर हुबेई प्रांत प्रशासनानं त्यांच्यावर निर्बंध लादले.

या विषाणूच्या प्रसारासाठी अमेरिकेनं चीनला जबाबदार धरलं आणि चीन पारदर्शक नसल्याचा आरोप केला. परंतु चीननं परराष्ट्रांशी सहकार्य केल्याचं सांगत जागतिक आरोग्य संघटना चीनची बाजू घेतं. या विषाणूबद्दल अद्याप निश्चित माहिती नसते परंतु करोना प्रकारातील एक यावर शिक्कामोर्तब करत त्याचं कोविड – १९ (COVID – 19) असं नामकरण करण्यात येतं.

आर्थिक दुष्परिणाम

फेब्रुवारी १५ रोजी आशियाबाहेरील पहिला मृत्यू फ्रान्समध्ये नोंदवण्यात येतो. आर्थिक दुष्परिणाम आता भोगायला लागतील असा सूर जगभर उमटायला लागतो कारण जागतिक स्तरावरील क्रीडास्पर्धा रद्द व्हायला लागलेल्या असतात. २४ मार्च रोजी तर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ऐतिहासिक निर्णय घेते आणि टोक्योमधल्या स्पर्धा पुढे ढकलल्याचे जाहीर करते.

फेब्रुवारीच्या अखेरीस विषाणू बाधितांची संख्या वाढतच चालल्याचं निदर्शनास येतं, विशेष म्हणजे इटली, दक्षिण कोरिया व इराणमध्ये हा प्रसार सर्वाधिक झालेला दिसतो. चिनी अधिकारी सांगतात की मुख्य चिनी भूमीमध्ये विषाणूचा प्रसार नियंत्रणात येण्यास सुरूवात झालेली आहे.

जगभरात उमटलेले पडसाद

मार्च ६ रोजी जगभरात बाधा झालेल्या रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार केल्याचे समोर येते. चीनखालोखाल इटली हा देश सर्वाधिक बाधा झालेला देश असल्याचे आढळते. इटली अत्यंत कडक निर्बंध कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी लागू करतं. परंतु, उपचार देण्यासाठी वैद्यकीय सामग्री तुटपुंजी असल्याचे व हॉस्पिटलमध्ये जागाच नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी सांगतात.

शेवटी मार्च ११ रोजी जागतिक आरोग्य संघटना जाहीर करते की कोविड – १९ ही जागतिक साथ आहे आणि जगातल्या सगळ्या देशांनी योग्य ती उपाययोजना करावी असं आवाहन करण्यात येतं. अमेरिका युरोपातून येणाऱ्यांसाठी आपल्या सीमा बंद करतं. जगभरातले शेअर बाजार कोसळतात, आणि सुपरमार्केट्सच्या बाहेर सामानाचा साठा करून घेण्यासाठी रांगाच रांगा लागतात.

जगाची अर्धी लोकसंख्या बंदिस्त होते

युरोप हा कोविड-१९ चा नवा केंद्रबिंदू असल्याचं जागतिक आरोग्य संघटना मार्चमध्ये जाहीर करते. स्पेन, फ्रान्स व ब्रिटनही आपापल्या देशांमध्ये निर्बंध जारी करतात. संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या प्रकारे लॉकडाउन जाहीर केले जातात. १०० पेक्षा जास्त देशांना या विषाणूनं ग्रासलेलं असतं आणि जगातल्या जवळपास निम्म्या लोकांना असं आवाहन करण्यात येतं की त्यांनी घराबाहेर पडू नये. बळींची व संशयितांची संख्या वाढतच राहते नी हॉस्पिटलं कमी पडायला लागतात. विविध देशांमध्ये संचारबंदी, जमावबंदी व आणीबाणी जाहीर करण्यात येते. नागरिकांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होते की काय असं वाटावं इतके निर्बंध लादले जातात.

शिक्षणसंस्था बंद होतात, विमान वाहतूक ठप्प होते, ऑफिसेस बंद होतात नी घरून काम स्वाभाविक गोष्ट ठरायला लागते. परिस्थिती इतकी भीषण होते की माद्रिदसारख्या ठिकाणी बर्फाच्छादित ठिकाणांना शवागार बनवण्यात येतं तर न्यू यॉर्कमध्ये सेंट्रल पार्कमध्ये आपत्कालिन रूग्णालये उभारण्यात येतात. झोपडपट्ट्या किंवा दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये निर्बंध लागू करणं जिकिरीचं होतं आणि जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा हिंसाचाराचा अवलंब करण्यास उद्युक्त होतात.

साधनांची कमतरता व वाद विवाद

बहुतेक सर्व देशांमध्ये मास्क, सॅनिटायझर्स, व्हेन्टिलेटर्स आदींची चणचण भासायला लागते. उपलब्ध सामग्री मिळवण्यासाठी देशांची चढाओढ सुरू होते. बहुतेक देश अत्यंत आवश्यक स्थिती असेल तरच चाचणी करण्याचा व स्रोत सांभाळून वापरण्याचे ठरवतात. तर दक्षिण कोरिया, जर्मनी व सिंगापूर प्रचंड मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्याचा व त्यायोगे विषाणूचा प्रसार आवाक्यात राखण्याचा मार्ग अवलंबतात. दक्षिण कोरिया तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विषाणू बाधित शोधण्याचा मार्ग अवलंबतं जे खासगी अधिकारांचं उल्लंघन मानलं जाणाऱ्या देशांना शक्य होत नाही.

विषाणूच्या लसीचा शोध सुरूच राहतो, परंतु या वर्षाअखेरीपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता धूसर दिसते. काही देश मलेरिया प्रतिबंधक औषधांचा वापर करायचं ठरवतं परंतु तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिलाय.

१९४५ नंतरची सर्वाधिक मोठी आपत्ती

दुसऱ्या जागतिक युद्धानंतरची ही सर्वात मोठी आपत्ती असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी मार्च अखेरीस म्हटलंय. यामुळे जगभरात तणाव निर्माण होण्याची शक्यता असून आर्थिक मंदीची भीती असून नजीकच्या भूतकाळात बघितली नसेल इतकी तीव्र मंदी असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जागतिक बाजाराला चालना देण्यासठी अब्जावधी डॉलर्स ओतण्याची तयारी महासत्तांनी दर्शवली आहे. अमेरिकेमध्ये बेरोजगारीनं नवा उच्चांक गाठला असून आर्थिक मंदीची ही चाहूल मानली जात आहे.

हुबेई प्रांत व वुहान जिथून करोनाची लागण सुरू झाली, आता संकटातून बाहेर पडत असल्याची चिन्हे आहेत. परंतु इटली जिथं १० हजारांपेक्षा जास्त बळी गेलेत व स्पेन जिथंही हजारो बळी गेलेत तिथं मात्र अद्याप परिस्थिती बिकट असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे जगभरातल्या एकूण बाधितांपैकी २५ टक्के एकट्या अमेरिकेत असल्याचे व बळींची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. काहींनी तर अमेरिकेमध्ये एक लाखाच्या घरात बळी जाऊ शकतात अशी भीती वर्तवली आहे.

एप्रिलची सुरूवात आशादायक नाहीच

एप्रिलच्या सुरूवातीला जगभरातील करोना बाधितांची संख्या १० लाखांपेक्षा जास्त झाली असून बळींची संख्या ६० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. जर निर्बंध उठवले तर करोना बाधेची दुसरी लाट येईल का अशी भीती मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे. जगभरात मानवी जिविताची व वित्ताची किती हानी येत्या काळात होणार आहे हे अद्याप अस्पष्टच आहे.