जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे.  मागील चोवीस तासांत देशभरात 3 हजार 525 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 122 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 74  हजार 281  वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 47 हजार 480 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 24 हजार 386 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 2 हजार 415 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

इतर देशांपेक्षा भारतात करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे सुमारे3.2 टक्के इतके आहे. काही राज्यांमध्ये तर हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. या तुलनेत जागतिक करोना मृत्युदर 7.5टक्के राहिलेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी दिली.

हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 14 दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण 10.9दिवस होते. गेल्या तीन दिवसांमध्ये ते 12.2 दिवसांवर आले आहे. केवळ 2.37 टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 0.41 टक्के रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर आहेत, तर 1.82 रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागत आहे.

देशभरातील नमुना चाचण्यांची क्षमता प्रतिदिन एक लाखांवर पोहोचली असून  गेल्या आठवडय़ात ती 95 हजार होती. 347 सरकारी तसेच, 137 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांत आत्तापर्यंत 17 लाख 62 हजार 840 नमुना चाचण्या झाल्या आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये 191 नमुना चाचण्या झाल्या, असे हर्षवर्धन म्हणाले.