चीनच्या नऊ महिने आधी स्पेनच्या बार्सिलोना येथील सांडपाण्यात करोना व्हायरसचे नमुने सापडले होते असा दावा स्पॅनिश व्हायरोलॉजिस्टनी केला आहे. मार्च २०१९ मध्येच करोनाचे नमुने बार्सिलोना येथील सांडपाण्यात सापडल्याचं या व्हायरोलॉजिस्टनी म्हटलं आहे. बार्सिलोना विद्यापीठाने या संदर्भातली माहिती दिली आहे.

बार्सिलोना येथील विद्यापीठाने सांडपाण्याचे नमुने तपासले, त्यामध्ये एप्रिल २०२० पर्यंतच्या सांडपाण्याच्या नमुन्यांचा समावेश होता. त्यामधून काय तथ्य समोर येतं ते त्यांना पाहायचं होतं. गेल्या वर्षभरातील सांडपाण्याचे नमुने त्यांनी तपासले. ज्यात मार्च २०१९ मध्येच कोविड १९ या व्हायरसचे काही नमुने बार्सिलोनाच्या सांडपाण्यात आढळल्याचं या विद्यापीठाने म्हटलं आहे. खरंतर बार्सिलोना या ठिकाणी १५ जानेवारी २०२० ला व्हायरस आढळला, ही तारीख त्यांच्याकडे करोनाचा पहिला रुग्ण अधिकृत रित्या मिळण्याच्या ४१ दिवस आधीची आहे. व्हायरस आढळल्यानंतर त्यांनी जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१९ या कालावाधीतले सांडपाणी तपासले. ज्यामध्ये त्यांना १२ मार्च २०१९ ला घेतलेल्या नमुन्यांमध्ये काही प्रमाणात व्हायरसचे अंश सापडले असं आता त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान स्पॅनिश सोसायटी फॉर पब्लिक हेल्थ अँड सॅनेटरी अॅडमिनिस्ट्रेशनचे जॉन रमोन विल्लाबी यांनी रॉयटर्सला याबाबत सांगितले की, “सध्याच्या घडीला फक्त या नमुन्यांविषयीचा फक्त एक निकाल समोर आलाय. अशा स्थितीत अभ्यास आणखी वाढवावा लागेल. आणखी नमुने बारकाईने तपासावे लागतील. ज्या प्रयोगशाळेने हा दावा केला आहे त्यात काही त्रुटी नाहीत नाही? त्यांनी कालावधी कोणता निवडला होता हेदेखील तपासावं लागेल” दरम्यान असं असेल तर मात्र ही बाब निश्चितच महत्त्वाची आहे असंही विल्लाबी यांनी म्हटलं आहे.