अमेरिकन काँग्रेसच्या दोन खासदारांना करोना विषाणूची लागण झाली आहे. मारियो डियाज-बलार्ट आणि बेन मॅकएडम्स यांना करोनाचा झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही खासदारांनी करोना चाचणी केली होती. याच चाचणीमध्ये त्यांना करोना झाल्याचे उघड झालं.

डियाज-बलार्ड यांच्या कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धी पत्रकामध्ये “शनिवारी संध्याकाळी बलार्ट यांना ताप आणि डोकेदुखी सारखी लक्षणे दिसून आली. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची करोना चाचणी करण्यात आली ज्यामध्ये त्यांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आलं,” असं म्हटलं आहे. फ्लोरिडामधील खासदार असणाऱ्या बलार्ट यांनी उपचार सुरु झाल्यानंतर आपल्यात बरीच सुधारणा असल्याचंही स्पष्ट केलं आहे. मात्र करोनाला सामान्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असंही बलार्ट यांनी स्पष्ट केलं आहे. “या कठीण प्रसंगी आपल्याला एक देश म्हणून अधिक मजबुतीने उभं राहण्याची गरज आहे. आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे,” असं बलार्ट म्हणाले आहेत. मात्र बलार्ट यांना करोनाचा संसर्ग कसा झाला याबद्दल कोणतीही माहिती त्यांच्या कार्यालयाने दिलेली नाही.

बुधवारी संध्याकाळी युटाचे काँग्रेस खासदार मॅकएडम्स यांनीही स्वत:ला करोना झाल्याची माहिती दिली. ट्विटवरुन त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. “आज मला कळलं की माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे मला समजले. मी आता घरून माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी काम करत आहे. माझ्यामुळे जनतेची गैरसोय होणार नाही याची मी काळजी घेत आहे,” असं मॅकएडम्स यांनी म्हटलं आहे. या दोन्ही खासदारांना करोना झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांची चाचणी केली जात आहे.