उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊमध्ये पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. हे दोघेही तरुण डॉक्टरांसारखा पोषाख करुन रस्त्यावर भटकत होते. सुरुवातील पोलिसांनाही यांच्याबद्दल काहीच संक्षयास्पद वाटलं नाही. मात्र नंतर त्यांच्या हलचालीवरुन आणि वागण्यावरुन पोलिसांनी त्यांची चौकशी केली. शहरातील पॉलिटेक्नीक क्रॉसिंगजवळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा हे दोघे डॉक्टर नसल्याची माहिती समोर आली.

विभूती खंड येथील पोलीस निरीक्षक श्याम बाबू शुक्ला यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना नक्की काय घडलं ते सांगितलं. “हे दोघेही आपल्या घरुन डॉक्टरांसारखे कपडे घालून निघाले. लॉकडाउनमुळे शहरभरातील रस्त्यांवर जागोजागी पोलिसांनी तपासणी केली आहे. अशाच एका नाकाबंदीजवळ पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी थांबवले. यावेळी या दोघांनी आम्ही डॉक्टर असून करोनाच्या रुग्णांवर उपचार करतो अशी माहिती दिली,” असं शुक्ला यांनी सांगितलं आहे. मात्र हे दोघांची हलचाल आणि एकूण हावभाव पोलिसांना संक्षयास्पद वाटले. दोघेही नशेत असल्याचे पोलिसांना दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांची झडती घेतली त्यावेळी एका तरुणाकडे स्मॅक हा अंमली पदार्थ अढळून आला. स्मॅक हा हेरोईनचा एक प्रकार आहे. अटक करण्यात आलेल्या एका मुलाचे नाव ऑस्टीन पॉल आहे तर दुसऱ्या मुलाचे नाव सनी आहे. ऑस्टीन हा किंग जॉर्ज मेडिकल विद्यापिठामध्ये वैद्यकीय अभ्यास क्रमासंदर्भातील विभागामध्ये काम करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >>अजब प्रेमाची गजब कहाणी… लॉकडाउनदरम्यान प्रेमी युगुल घरातून पळालं पण…

दोघांनाही अंमली पदार्थांचे सेवन करण्याची सवय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपल्याला नशा करण्यासाठी कुठे हेरोईन मिळतेय का हे पाहण्यासाठी दोघेही डॉक्टरांसारखे कपडे घालून शहरात भटकत होते. या दोघांकडे एकूण ११ ग्रॅम स्मॅक अढळून आलं आहे. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये सध्या लॉकडाउन सुरु आहे. २५ मार्च ते १४ एप्रिल या २१ दिवसांच्या कालावधीमध्ये लॉकडाउन सुरु राहणार आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये कारण नसताना रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मूभा देण्यात आली आहे. लॉकडाउनदरम्यान बाहेर भटकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. असं असतानाही अनेक ठिकाणी हे लॉकडाउन लोकांनी गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही. त्यामुळेच पोलिसांना उगाच रस्त्यावर भटकणाऱ्यांना चोपही द्यावा लागत आहे.

उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. लखनऊ, कानपूर, आग्रा, गाझियाबाद, नोएडा हे जिल्हे करोना संसर्गासाठी हॉटस्पॉट असल्याचे सांगितले जात आहे. अनेक ठिकाणं सील करण्यात आली आहे.