ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. बुधवारी त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाचे नाव जॉन्सन यांनी त्यांच्यावर करोनाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवत अनोख्या पद्धतीने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सायमंड्स यांनीच यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन माहिती दिली.

विलफ्रड लॉरी निकोलस जॉन्सन असं या बाळाचे नाव असून निकोलस हे नाव जॉन्सन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. निक प्रिन्स आणि निक हार्ट असं जॉन्सन यांच्यावर उपचार केले. हे दोन्ही डॉक्टर संसर्गजन्य रोग आणि व्हेंटिलेटर्स स्पेशॅलिस्ट आहेत. बाळाच्या नावाबद्दल सायमंड्स यांनी त्यांच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. “विलफ्रड हे बोरिस यांच्या आजोबांचे नाव आहे. लॉरी हे माझ्या आजोबांचे नाव आहे. तर निकोलस हे डॉक्टर निक प्रिन्स आणि निक हार्ट यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. याच दोन डॉक्टरांनी मागील महिन्यामध्ये बोरिसचे प्राण वाचवले,” असं नावाचं स्पष्टीकरण सायमंड्स यांनी पोस्ट केलं आहे. ट्विटवरुनही त्यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसमधील डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

२७ एप्रिल रोजी पुन्हा सरकारच्या कोविड १९ विरोधी दलाची सूत्रे हाती घेणाऱ्या जॉन्सन यांनाही १२ एप्रिल रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांचे आभार व्यक्त करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी माझे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानतो असं म्हटलं होतं.

नक्की वाचा >> “करोनावरील उपचारादरम्यान माझा मृत्यू झाला असता तर…”; ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केला खुलासा

“लोकांनी टाळेबंदीबाबत संयम दाखवून ती उठवण्यासाठी लगेच आग्रह धरू नये असे मत त्यांनी  व्यक्त केले. देश सध्या कोविड १९ साथीच्या परमोच्च बिंदूकडे वाटचाल करीत असून अजूनही खूप मोठी जोखीम आहे, सरकार  कोविड १९ साथ आटोक्यात आणण्यासाठी जे निर्णय घेईल त्यात संपूर्ण पारदर्शकता असेल,” असं जॉन्सन यांनी २७ एप्रिल रोजी पुन्हा सरकारच्या कोविड १९ विरोधी दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्पष्ट केलं आहे. जॉन्सन यांना गेल्या महिन्यात करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना लंडन येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. २६ एप्रिल रोजी ते १० डाऊनिंग स्ट्रीट येथील अधिकृत निवासस्थानी परत आले.