ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे सध्या करोनाशी लढा देत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांना लागण झाल्याचं समोर आलं होतं. स्वतःच विलगीकरण केल्यानंतरही जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं सोमवारी त्यांना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जॉन्सन यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूची जगभरातील अनेक नामवंत व्यक्तींनाही लागण होत आहे. यात अनेकांचा मृत्यू झाला असून, काही जण त्यावर मात करून बरे झाले आहेत. करोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येनं सगळ्यांच्या चिंतेत भर पडत असताना २७ मार्च रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांनी स्वतः फेसबुकवरून याची माहिती दिली होती.

करोनाचा संसर्ग झाल्यानंतर पंतप्रधान जॉन्सन यांनी स्वतःला विलग करून घेतलं होत. तेथूनच ते संपूर्ण काम बघत होते. मात्र, ताप कमी होत नसल्यानं त्यांना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. ६ एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर उपचार सुरू असताना जॉन्सन यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाली. त्यामुळे त्यांना तातडीनं अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. जॉन्सन यांच्यावर सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.

ब्रिटनमध्ये जवळपास पाच हजार लोकांचा मृत्यू –

फेब्रुवारीच्या अखेरीस पहिला करोनाबळी नोंदवलेल्या इटलीत या रोगाने १५,८७७ बळी घेतले आहेत. येथे १२८,९४८ लोकांना संसर्ग झाला असून, २१,८१५ लोक बरे झाले आहेत. स्पेनमध्ये करोनामुळे १३०५५ मृत्यू झाले आहेत, तर १३५,०३२ लोक करोनाबाधित आहेत. अमेरिकेत करोनाने ९६४८ बळी घेतले असून, तेथील करोनाबाधितांची संख्या जगात सर्वाधिक, म्हणजे ३ लाख ३७ हजार ६४६ इतकी आहे. फ्रान्समध्ये ९२,८३९ लोकांना करोनाचा संसर्ग झाला असून, ८०७८ लोक मरण पावले आहेत. ब्रिटनमधील करोनाबळींची संख्या ४९३४ असून, ४७,८०६ लोक करोनाबाधित आहेत. चीनने आतापर्यंत ३३३१ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus uk prime minister boris johnson has been taken to intensive care bmh
First published on: 07-04-2020 at 06:13 IST