करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला खूप मोठा फटका बसलेला असून गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्या तीन लाखांच्या पुढे आहे. एकीकडे आरोग्य सुविधांचा तुटवडा असताना दुसरीकडे केंद्र सरकार करोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे. अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केला असताना केंद्राकडूनही लॉकडाउनचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे.

“महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवला पाहिजे”

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोग्य सुविधांवर ताण आलेले जिल्हे जिथे पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तिथे लॉकडाउन लागण्याची गरज असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र अंतिम निर्णय राज्य सरकारांसोबत चर्चा केल्यानंतरच केंद्राकडून घेतला जाणार आहे.

या प्रस्तावात नंतर बदल केला जाऊ शकतो मात्र या जिल्ह्यांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत बैठकीत मांडण्यात आलं. “करोनाची साखळी तोडण्यासाठी जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुढील काही आठवडे कडक लॉकडाउनची गरज,” असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

देशात गेल्या २४ तासांत एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद
भारतात मंगळवारी रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३२९३ रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे ३२९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी करोनावर मात केली आहे.