News Flash

भारताला बसणार फटका; आर्थिक विकासदराच्या शर्यतीत राहणार चीनच्या मागे

१९३० नंतर पहिल्यांदाच जगासमोर एवढे मोठे आर्थिक संकट, संयुक्त राष्ट्राचा अहवाल

फाइल फोटो

संयुक्त राष्ट्रसंघाने भारताची यंदाच्या वर्षातील आर्थिक वाढ ही १.२ टक्के इतकीच असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ३.२ टक्क्यांची पडझड होण्याचा अंदाजही संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केला आहे. करोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून सर्व देशांना याचा फटका बसला आहे. १९३० नंतर पहिल्यांदाच जगासमोर एवढे मोठे आर्थिक संटक उभं असल्याचंही संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे. याच अहवालामध्ये भारतापेक्षा चीनची आर्थिक दरवाढ अधिक राहणार असल्याचेही नमूद करण्यात आलं आहे. मात्र जगातील सर्वात श्रीमंत देशांना करोनाचा मोठा फटका बसणार असल्याचंही या अहवालात म्हटल्याचे वृत्त ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भात भाष्य करताना संयुक्त राष्ट्राने जगाचा सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच जीडीपीमध्ये ३.२ टक्क्यांनी पडझड होईल असं म्हटलं आहे. असं असलं तरी २०२१ मध्ये हळूहळू जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. करोनाच्या संकटामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला उत्पादनांच्या माध्यमातून मिळणारा लाभ कमी होणार असून ८.५ ट्रिलियन डॉलर इतके नुकसान होणार आहे. मागील चार वर्षांमध्ये जगतिक अर्थव्यवस्थेला उत्पादनांच्या माध्यमातून झालेला फायद्याचाही काहीच उपयोग होणार नाही.

भारताबद्दल काय म्हटलं आहे?

संयुक्त राष्ट्राने ‘जागतिक आर्थिक परिस्थिती आणि शक्यता’ या नावाने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये २०१९ साली आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेवर लॉकडाउनचे गंभीर परिणाम होतील असं म्हटलं आहे. भारताचा आर्थिक विकासदर या वर्षी १.२ टक्क्यांहून अधिक नसेल असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालामध्ये भारताचा विकासदर हा १.२ टक्के असेल असं म्हटलं असून २०१९ मध्येही भारत आर्थिक संकटांचा समाना करत होता असं नमूद केलं आहे. मागील वर्षी भारतचा जीडीपी ४.१ टक्का इतका होता. २०१८ मध्ये ६.८ टक्के विकासदर असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला आता थेट २०२१ मध्ये चांगले दिवस पहायला मिळणार असल्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. पुढील वर्षी भारताचा आर्थिक विकासदर ५.५ टक्के राहण्याची शक्यता आहे.

चीन भारतापेक्षा सरस ठरणार

या अहवालामध्ये भारतापेक्षा चीनचा आर्थिक विकासदर अधिक असेल असंही म्हटलं आहे. २०२० मध्ये चीनचा आर्थिक विकासदर १.७ टक्के म्हणजेच भारतापेक्षा ०.५ टक्के अधिक असेल असा संयुक्त राष्ट्राचा अंदाज आहे. जगातील सर्वात श्रीमंत देशांना करोनाचा सर्वात मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता या अहवालामध्ये वर्तवण्यात आली आहे. अमेरिका, जपान युरोपीय देशांच्या आर्थिक विकासदर उणेमध्ये म्हणजेच नकारात्मक असेल असं या अहवालात म्हटलं आहे.

श्रीमंत देशांना सर्वाधिक फटका

संयुक्त राष्ट्राच्या या अहवालामध्ये २०२० साली अमेरिकेचा आर्थिक विकासदर हा उणे ४.८ टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जपानचा आर्थिक विकासदर हा उणे ४.२ राहील असं अहवालात म्हटलं आहे. युरोपीन युनियनमधील देशांचाही आर्थिक विकासदर नकारात्मक राहणार असून तो उणे ५.४ राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 3:02 pm

Web Title: coronavirus united nations slashes indias growth rate for 2020 21 china to lead scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 शाळा पुन्हा कधी सुरु होणार? केंद्र सरकारने दिलं उत्तर
2 असा असू शकतो लॉकडाउन ४.०, रेड झोनमध्येही दिलासा मिळण्याचे संकेत
3 दुर्दैवी! कोमातून बाहेर आल्यानंतर कळलं पत्नीचा करोनामुळे झाला मृत्यू, त्यानंतर घडलं असं काही…
Just Now!
X