कित्येक महिने करोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर लसीमुळे वातावरणातील भीती कमी होताना दिसत आहे. लस आल्यानंतरही सरकारकडून करोनासंदर्भातील सर्व खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना चीनमध्ये आता आईस्क्रीममध्येही करोनाचे विषाणू आढळून आले आहेत. यातील ३९० डब्ब्याची विक्री करण्यात आली असून, खरेदी करणाऱ्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर चीनमध्ये आईस्क्रीवर करोनाचे विषाणू आढळून आले आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाची झोप उडाली असून, तातडीची पावलं उचलण्यात आली आहेत. The Daqiaodao Food Co., Ltd.या कंपनीच्या आईस्क्रीमध्ये करोनाचे विषाणू आढळून आले असून, प्रशासनानं कंपनी सील केली आहे. त्याचबरोबर कंपनीत सॅनिटायझेशन केलं जात असून, कंपनीतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्याही करण्यात आल्या आहेत.

करोना संक्रमित आईस्क्रीमचे २९ हजार डब्ब्यांची अद्याप विक्री झालेली नाही. फक्त ३९० डब्बेच तियानजिनमध्ये विकले गेले असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. स्थानिक प्रशासनानं आता आईस्क्रीम खरेदी करणाऱ्या नागरिकांचा शोध सुरू केला आहे. त्याचबरोबर आईस्क्रीम विक्रेत्यांनाही याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. या आईस्क्रीमध्ये न्यूझीलंडमधील दूध भूकटी आणि युक्रेनमधील दह्याची भूकटीचा समावेश केला जातो. हे पदार्थ परदेशातून मागविण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

आईस्क्रीममध्ये करोनाचे विषाणू आढळून आल्यानंतर कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. १६६२ कर्मचाऱ्यांची करोना चाचणी ही करण्यात आली असून, त्यापैकी ७०० कर्मचाऱ्यांचे अहवाल करोना निगेटिव्ह आले आहेत. तर इतर कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत, अशी माहिती प्रशासनानं स्थानिक माध्यमांना दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus update chinese city reports coronavirus found on ice cream bmh
First published on: 17-01-2021 at 13:08 IST