देशातील करोना संक्रमणाचा वेग मंदावला असला, तरी दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहे. दिवसेंदिवस आढळून येणाऱ्या रुग्णांमुळे देशातील एकूण रुग्णसंख्येनं १ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. देशातील रुग्णसंख्या १ कोटी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

देशभरातातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटींच्या पुढे गेली आहे. मागील २४ तासांत देशात २५ हजार १५३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. नव्या रुग्णसंख्येसह एकूण संख्या १ कोटी ४५ लाख १३६ वर पोहचली आहे. देशात सध्या ३ लाख ८ हजार ७५१ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्येनं १ कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर राहुल गांधींनी ट्विट करत लॉकडाउनवरून टीकास्त्र डागलं आहे.

जवळपास दीड लाख मृत्यूसह देशातील करोना बाधित रुग्णांची १ कोटी झाली आहे. पंतप्रधानांनी २१ दिवसांत करोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा दावा केला होता. मात्र, अनियोजित लॉकडाउनमधून ते साध्य झालं नाही. पण, देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं,” असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारने लागू केलेल्या लॉकडाउनवर टीका केली आहे.

महाराष्ट्रासह पाच राज्यात करोनामुक्त रुग्णांची संख्या सर्वाधिक

देशात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळमध्ये करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे जवळपास ५२ टक्के इतके आहे. दररोज करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येतही घट झाली असून गेले १३ दिवस बळींची संख्या ५०० हून कमी आहे.