दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा झालेला स्फोट आणि विविध राज्यांत पुरेशा आरोग्य सुविधांअभावी रुग्णांची होत असलेली हेळसांड, यामुळे देशातील परिस्थिती बिकट बनली आहे. प्रचंड वेगानं होत असलेला प्रसार रोखण्यासाठी देशातील बहुतांश राज्यांनी लॉकडाउन आणि कडक निर्बंधांची पावलं उचलली. त्यामुळे काही प्रमाणात करोना रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. मात्र, दररोज होत असलेल्या मृत्यूंची संख्या कायम आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिवसभरातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. आकडेवारीनुसार देशातील करोना रुग्णसंख्येत घट होत असली, तरी मृत्यूंचं प्रमाण मात्र काळजी वाढवणारं आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन लाख २९ हजार ९४२ करोनाबाधित आढळून आले आहेत. मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे तीन लाख ५६ हजार ८२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

मृत्यूचं थैमान सुरूच…

देशात रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी मृत्यूचं प्रमाण वाढलं असून, ते कायम आहे. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस देशात दिवसाला चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती. हा आकडा काही प्रमाणात कमी झाला असला, तरी सरासरी कायम आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन हजार ८७६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींची संख्या दोन लाख ४९ हजार ९९२ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती कशी आहे?

राज्यात सोमवारी (१० मे) दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट झाली. राज्यात ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ही गेल्या काही आठवड्यांतील ही सर्वात निच्चांकी रुग्णसंख्या ठरली आहे. विशेष म्हणजे सोमवारी ६१ हजार ६०७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनाच्या २ कोटी ९६ लाख ३१ हजार १२७ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यातील ५१ लाख ३८ हजार ९७३ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.