देशातला करोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन हे लक्षात येतंय की करोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. काल दिवसभरातल्या देशातल्या मृत्युंच्या संख्येतही घट दिसून आली. मृतांचा आकडा हा तीन हजारांच्या खालीच होता.

देशात गेल्या २४ तासात२,४२७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. देशात प्रथमच करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन हजारांहून खाली आली आहे. आत्तापर्यंत देशातल्या तीन लाख ४९ हजार १८६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातला मृत्युदर आता १.२१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर देशातला रुग्ण बरे होण्याचा दर ९३.९४ टक्के झाला आहे.


देशातल्या काल दिवसभरातल्या नवबाधितांची संख्या ही बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी होती. गेल्या २४ तासांत देशात एक लाख ६३६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर काल दिवसभरात एक लाख ७४ हजार ३९९ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आता करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १४ लाख एक हजार ६०९ वर पोहोचली असून करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या दोन कोटी ७१ लाख ५९ हजार १८० झाली आहे.

आणखी वाचा- Coronavirus : अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण करण्यात ‘कोव्हिशिल्ड’ ‘कोव्हॅक्सिन’पेक्षा सरस; संशोधकांचा दावा

देशातली लसीकरण मोहीम सध्या जोमात सुरु असल्याचं दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १३ लाख ९० हजार ९१६ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी १३ लाख ११ हजार १६१ नागरिकांनी पहिला तर ७९ हजार ७५५ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या २३ कोटी २७ लाख ८६ हजार ४८२ वर पोहोचली आहे.