News Flash

देशात मृत्यूचं थैमान! सलग तिसऱ्या दिवशी हजारांहून अधिक करोनाबळी

करोना रुग्णसंख्या वाढीची लाट; देशात आढळले २,१७,३५३ करोना पॉझिटिव्ह

पतीचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं कळाल्यानंतर दिल्लीतील एका रुग्णालयासमोर दुःख अनावर झालेली महिला आणि तिची दोन्ही मुलं. (छायाचित्र । रॉयटर्स)

करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलं आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली पाठोपाठ देशातील इतर राज्यांतही करोनानं हातपाय पसरले असून, दररोज झोप उडवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. देशात पहिल्या लाटेतील उच्चांकांच्या दुप्पट रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेत नोंदवली गेली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली असून, मृत्यूचा आकडाही हजारांच्या पुढे आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात १ हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून, गेल्या २४ तासांत देशात दोन लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील गेल्या २४ तासांतील करोना परिस्थितीची आकडेवारी जाहीर केली आहे. यात रुग्णासंख्या वाढीबरोबरच मृत्यूंची संख्या वाढत असल्याचंही समोर आलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत तब्बल २ लाख १७ हजार ३५३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १ लाख १८ हजार ३०२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे देशातील मृतांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी एक हजारांच्या पुढे आहे. २४ तासांत भारतात १ हजार १८५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७४ हजार ३०८ झाली आहे.

आणखी वाचा- धोक्याचा इशारा! भारतात कोविडमुळे दररोज २ हजार २३० जणांचा होऊ शकतो मृत्यू

दिल्लीत वीकेंड लॉकडाउन

करोनाप्रसार रोखण्यासाठी हरयाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील दहा जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू झाली करण्यात आली आहे. दुसरीकडे दिल्लीतही करोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वीकेंड लॉकडाउनची घोषणा केली असून, अनेक निर्बंध घालण्यात येणार असल्याचं गुरुवारी सांगितलं. मॉल, व्यायामशाळा, स्पा आणि सभागृहे बंद ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. उपाहारगृहांमध्ये बसून भोजन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर चित्रपटगृहांमध्ये एकूण क्षमतेपैकी केवळ ३० टक्केच प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 10:41 am

Web Title: coronavirus updates india records 2 lakh 17 thousand new cases and 1185 deaths bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धोक्याचा इशारा! भारतात कोविडमुळे दररोज २ हजार २३० जणांचा होऊ शकतो मृत्यू
2 “लोकांना वाटतंय की, रेमडेसिवीरमुळेच त्यांचे जीव वाचणार आहेत”
3 अमेरिकेचे रशियावर निर्बंध
Just Now!
X