करोनाच्या पहिल्या लाटेमुळे कोलमडून गेलेलं जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसऱ्या लाटेनं धडक दिली. करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. करोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील जागतिक विक्रमांची दुर्दैवी नोंद भारतात झाली. फेब्रुवारीपासून देशातील परिस्थिती भयावह होण्यास सुरूवात झाली. मार्च आणि एप्रिलमध्ये मृत्यूचं तांडवच बघायला मिळालं. रुग्णालयांबाहेर रुग्णांच्या, मेडिकल बाहेर रेमडेसिवीरसाठी, तर स्मशानभूमींबाहेर अंत्यसंस्कारासाठी… असं ह्रदयाची कालवाकालव करणारी अभूतपूर्व परिस्थिती दिसली. या भयावह परिस्थिती हळहळू कमी होत असून, देशातून करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हं आकडेवारीतून दिसत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील दररोजची आकडेवारी जाहीर करण्यात येते. गेल्या २४ तासांतील करोना परिस्थितीबद्दलचे आकडे मंत्रालयाने प्रसिद्ध केले असून, दिलासादायक चित्र दिसत आहे. २४ तासांत देशात एक लाख ६५ हजार ५५३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन लाख ७६ हजार ३०९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशभरात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. सध्या देशात २१ लाख १४ हजार ५०८ रुग्ण उपचार घेत आहेत. २४ तासांत आढळून आलेले रुग्णसंख्या ही ४६ दिवसांनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. म्हणजेच सहा आठवड्यानंतर देशात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्राकडून योजना

मृतांच्या संख्येत घट, पण…

करोना रुग्णवाढीबरोबरच देशातील मृतांची वाढत्या संख्येनं काळजी वाढवली होती. देशात दिवसाला साडेचार हजार मृत्यू नोंदवले गेले. काही आठवडे देशात दिवसाला साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोपच उडाली होती. मात्र, आता हळूहळू रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन ४६० रुग्णांचा मृत्यू झाल्यांची नोंद झाली आहे. मात्र, मृत्यूंचा हा आकडा अजूनही चिंताजनकच आहे.

प्राणवायूच्या तुटवड्याला केंद्राची अकार्यक्षमता कारणीभूत – प्रियंका

केंद्राकडून रेमडेसिविर पुरवठा बंद

केंद्राकडून राज्यांना होणारा विषाणूरोधक रेमडेसिविर या औषधाचा पुरवठा आता केंद्राने थांबवला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी या निर्णयाची माहिती दिली. “राज्यांकडे पुरेसा साठा असल्याने आता केंद्राकडून पुरवठ्याची गरज नाही. आता देशातही रेमडेसिविरचा पुरेसा साठा आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आम्ही राज्यांना रेमडेसिविरचा पुरवठा थांबवत आहोत,” असं त्यांनी सांगितलं.