News Flash

Coronavirus: करोनाचा संसर्ग नको म्हणून दाम्पत्याने मनाने घेतलं औषध; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

हे औषध या दोघांना कुठून मिळालं याचा शोध सध्या आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे

Coronavirus: करोनाचा संसर्ग नको म्हणून दाम्पत्याने  मनाने घेतलं औषध; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
प्रातिनिधिक फोटो(Photo - Nadia Shira Cohen The New York Times)

करोनाने जगभरामध्ये थैमान घातलं आहे. जगभरात करोनामुळे १६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देश करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतानाचे चित्र दिसत आहे. असं असतानाच अमेरिकेमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका दाम्पत्याने करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:च्या मनानुसार काही औषधे घेतली. या औषधांमुळे पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीबरोबरच त्याच्या पत्नीनेही औषधे घेतली होती. या महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना अरेझोनामध्ये घडली आहे. या दोघांनी क्लोरेक्वीन फॉस्फेट हे औषध घेतल्याचे समजते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच करोनावर क्लोरेक्वीन फॉस्फेट हे औषध फायद्याचे ठरु शकते असं म्हटलं होतं. मात्र या दाम्पत्याने डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:च हे औषध घेतल्याने त्यांच्यावर संकट ओढावले. क्लोरेक्वीन फॉस्फेट हे मलेरियावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे औषध आहे. मलेरियावर उपचार करण्यासाठी हे औषध वापरण्यास अन्न आणि औषध प्रशासनाची मंजूरी आहे. मलेरियाबरोबरच काही ठराविक त्वचारोग आणि संधीवातासाठी हे औषध वापरलं जातं. मात्र हे औषध करोनासाठी वापरण्यात यावे असं अन्न आणि औषध प्रशासनाने सांगितलेलं नाही.

अमेरिकेमधील बॅनर हेल्थ या बड्या रुग्णालयाने एक पत्रक जारी करुन क्लोरेक्वीन फॉस्फेट हे औषध सामान्यांनी स्वत:च्या मनाने घेऊ नये असा इशारा दिला आहे. “कोवीड-१९ वरील उपचारांबद्दल अद्यापही अनिश्चितता आहे. त्यामुळे आम्ही अद्याप वेगवेगळ्या उपचार पद्धतीवर अभ्यास करत आहोत. मात्र यावर सेल्फ मेडिटेशन म्हणजेच स्वत:च्या मनाने औषध घेणे हा पर्याय असू शकत नाही,” असं मत बॅनर पॉयझन अण्ड ड्रग्स इन्फॉर्मेशन सेंटरचे संचालक डॉक्टर डॅनियल ब्रुक्स यांनी व्यक्त केलं आहे. या दाम्पत्याला हे औषध कसं मिळालं यासंदर्भातील तपास आरोग्य विभाग करत आहे. हे औषध घेतल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये या दाम्पत्यावर औषधाचे परिणाम जाणवू लागल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनावर उपचार करण्यासाठी हे औषध उपयोगी ठरु शकते असं ट्विट केलं होतं. मात्र यासंदर्भात अद्याप संशोधन करणे गरजेचे असल्याचं वैद्यकीय श्रेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या लोकांना हे औषध करोनावर उपचार करु शकते असं वाटतं आहे त्या लोकांना यासंदर्भात जागृत करणं गरजेचं असल्याचं डॉक्टर ब्रुक्स यांनी म्हटलं आहे.

भारतामध्ये करोनावर उपचार करण्यासाठी हायड्रोऑक्सीक्लोरीक्वीन हे औषध वापरले जात आहे. ज्या व्यक्तींना अधिक धोका आहे त्या रुग्णांसाठी आणि या रुग्णांवर उपचार करताना सतत करोना विषणूचा संसर्ग होण्याची शक्यता असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीच हे औषध वापरलं जात आहे. करोना झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांनाही करोना होऊ नये म्हणून डॉक्टर हे औषध देत आहेत. मात्र इंडियन काऊन्सील ऑफ मेडिकल रिसर्चचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांनी हे औषध केवळ अधिकृत डॉक्टरांनी सांगितल्यावरच देण्यात यावे असं म्हटलं आहे.

अमेरिकेमध्ये घडलेलं प्रकरण पाहता करोनाची कोणतीही लक्षणं दिसल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणेच त्या रुग्णाच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीने फायद्याचे आहे. घरच्या घरी उपचार करणे टाळले पाहिजेच हेच या प्रकरणामधून दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 1:22 pm

Web Title: coronavirus us man self medicates with chloroquine to treat coronavirus gets poisoned and passes away scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 COVID-19 : सानिया मिर्झा करणार हातावर पोट असणाऱ्यांना आर्थिक मदत
2 WHO कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक, UN ने भारताला दिला हा संदेश
3 … तर दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ; तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा
Just Now!
X