अमेरिकेत करोनाने थैमान घातलं असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला करोनाची लागण झाली आहे. सीएनएनने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांना करोनाची लागण झाली असल्याचं वृत्त दिलं आहे. रॉबर्ट यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच ट्रम्प प्रशासनातील उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट ओ ब्रायन यांच्यात शेवटची भेट कधी झाली होती हे अद्याप स्पष्ट नाही. १० जुलैला दोघे एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. रॉबर्ट ओ ब्रायन यांना करोनाची लक्षणं दिसत असून त्यांनी स्वत:चं विलगीकरण केलं आहे. राष्ट्रीय परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांमधूनच आपल्याला रॉबर्ट ओ ब्रायन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं आहे.

रॉबर्ट ओ ब्रायन काही दिवसांपूर्वी युरोपमधून परतले होते. तिथे त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी युके, फ्रान्स, जर्मनी आणि इटलीमधील काही अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत सिक्रेट सर्व्हिस एजंट, स्टाफ आणि अनेक रिपोर्टर्स उपस्थित होते. त्यांचे अनेक फोटोही प्रसिद्ध झाले होते ज्यामध्ये ते सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचं तसंच मास्कचाही वापर करत नसल्याचं दिसत होतं.