करोनाचा फैलाव होण्यासाठी चीन जबाबदार असल्याचा आरोप वारंवार अमेरिकेकडून करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनने करोनाची माहिती लपवली असून हा ‘करोना व्हायरस’ नसून ‘चायना व्हायरस’ असल्याचं म्हटलं आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सध्या खूप तणाव आहे. अशा परिस्थितीत चीनने सर्वात प्रथम लस विकसित केल्यास अमेरिका त्यांच्यासोबत काम करणार का ? असा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आपण कोणासोबतही काम करण्यास असल्याचं म्हटलं आहे. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

करोनाची लस विकसित करुन चांगला निकाल देणाऱ्या कोणासोबतही आपण काम करण्यास तयार आहोत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसंबंधी प्रश्न विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी अमेरिका करोनावरील उपचार आणि लस विकसित कऱण्यामध्ये चांगली प्रगती करत असल्याची माहिती दिली.

आणखी वाचा- “करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारत असतानाच….”, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्याऐवजी अजून बिकट होईल असं सांगितलं आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. “आपल्या देशातील काही ठिकाणी परिस्थिती सुधारत आहे. मात्र काही ठिकाणी अद्यापही चिंतेची बाब आहे. परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अजून बिकट होत जाणं जास्त दुर्दैवी आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं. “दक्षिण अमेरिकेतील अनेक भागांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असून चिंताजनक परिस्थिती आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- Cornavirus : ६४ वर्षांत पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार सोहळा रद्द

अमेरिकेत करोनाचा कहर असून आतापर्यंत १ लाख ४१ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी देशवासियांना करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क वापरा असं आवाहन केलं. “जेव्हा तुम्हाला सोशल डिस्टनसिंग पाळणं शक्य नाही तेव्हा तुम्ही मास्क वापरा असं आम्ही प्रत्येकाला सांगत आहोत,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

“तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल, मात्र मास्क वापरावाच लागेल. मास्क घातल्याने फरक पडतो. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला शक्य ते सर्व करावं लागणार आहे. करोनावर नियंत्रण मिळवणं नाही तर त्याला संपवणं हेच आपलं ध्येय आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. “करोनावरील लस येत असून लोक विचार करत आहेत त्यापेक्षाही वेगाने ती येईल,” असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला असून करोना नाहीसा होईल याचा पुनरुच्चार केला.