अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील आपली नाराजी जाहीर केली आहे. चीनने आपल्याला करोना व्हायरससंबंधी लवकर माहिती द्यायला हवी होती असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनीच चीनने करोनाच्या मुद्द्यावरुन दाखवलेल्या पारदर्शकतेवरुन कौतुक केलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरसंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, “आपल्या देशात काय सुरु आहे हे चीनने लवकर सांगायला हवं होतं. जोपर्यंत हे सार्वजनिक झालं नाही तोपर्यंत आम्हाला याची काहीच माहिती नव्हती”. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन अत्यंत गुप्त पद्धतीने वागतो आणि हे फार दुर्दैवी असल्याचंही म्हटलं आहे.

“मी चीनवर थोडा नाराज आहे. जितका मला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग आणि त्यांच्या देशाचा आदर आहे तितकंच त्यांनी कमी वेळात जे काही केलं आहे त्याचं कौतुकही आहे. मी त्यांना मदतीसाठी काही लोक पाठवू का अशी विचारणा केली होती. पण त्यांना मदत नको आहे, हा त्यांचा अभिमान आहे. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं.

२४ जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरससोबत लढा देताना ठेवलेल्या पारदर्शकतेवरुन चीन आणि शी जिनपिंग यांचं कौतुक केलं होतं. चीनने जागतिक आरोग्य संघटनेला व्हायरसंबंधी माहिती दिल्याच्या जवळपास एका महिन्यांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे कौतुक केलं. पण नंतर त्यांना यासंबंधी विचारलं असता त्यांनी फार आधीच ही पारदर्शकता ठेवायला हवी होती आणि व्हायरससंबंधी कळवायला हवं होतं असं मत नोंदवलं.