एकीकडे अमेरिकेत करोनाने थैमान घातलं असताना फ्लोरिडा मात्र करोनाचा संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलं होतं. देशातील अन्य भागांमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असताना फ्लोरिडामध्ये करोनाग्रस्तांची संख्या कमी होती. त्यामुळे आयसोलेशनमधून (किंवा लॉकडाउनमधून) पूर्वपदावर येण्याचा फ्रयत्न करणाऱ्यांसाठी फ्लोरिडा उत्तम पर्याय होता. अमेरिकेतील नागरिकांसाठी फ्लोरिडा एक आदर्श ठरत होतं. पण आता हेच फ्लोरिडा करोनाचं मुख्य केंद्र झालं आहे. वॉशिंग्टन पोस्टने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशन फ्लोरिडामधील शहरात घेण्यात आलं. तसंच ओरलँडो शहराजवळ एनबीएने डिस्ने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हंगामातील अंतिम सामन्याचं आयोजन केलं आणि मोकळ्या असणाऱ्या या ठिकाणी लाखोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवली. यामुळे काही आठवडे उलटल्यानंतर फ्लोरिडा आता करोनाचं मुख्य केंद्र ठरलं आहे.

आणखी वाचा- डोक्याला ताप: करोनामुळे मेंदुचे आजार होण्याची शक्यता – शास्त्रज्ञांचा इशारा

फ्लोरिडामध्ये सध्या प्रत्येक १०० व्यक्तीमागे एक व्यक्ती करोनाबाधित आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढत असून आयसीयूची क्षमताही संपत आली आहे. तसंच विलगीकरणात राहिल्यानंतर फ्लोरिडामध्ये आलेले अनेकजण सुरक्षेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून वाद निर्माण झाला आहे.

आणखी वाचा- शिक्कामोर्तब: WHO मधून बाहेर पडल्याचं अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांना कळवलं

अमेरिकेत करोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनावर कसं नियंत्रण मिळवावं यासाठी फ्लोरिडाचं उदाहरण दिलं होतं. पण आता येथील रहिवाशांना करोनाची परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीती वाटत आहे. अमेरिकेतील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून लवकरच ३० लाखांचा टप्पा गाठणार आहे. दुर्दैवाने या आकडेवारीत फ्लोरिडा राज्यही भर घालत आहे.

दरम्यान फ्लोरिडा प्रशासन मात्र टेस्टिंग वाढवल्याने करोनाचे रुग्ण वाढले असल्याचा दावा करत आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या डाटानुसार, फ्लोरिडामध्ये २ लाख १३ हजार ७९४ करोनाचे रुग्ण आहेत. गेल्या आठवड्यात फ्लोरिडामध्ये सर्वाधिक ८७६६ रुग्णांची नोंद करण्यात आली.