जगभरात थैमान घालणाऱ्या करोना संसर्गास प्रतिबंध करण्याच्यादृष्टीने एकीकडे कोविड -१९ वरील लशीला मंजुरी दिली जात असताना, दुसरीकडे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोलसोनारो यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ही लस लोकांना मगर बनवू शकते आणि महिलांना यामुळे दाढी देखील येऊ शकते. त्यांच्या या विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, जोरादार चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.

जेअर बोलसोनारो यांनी करोनावर परिणामकारक मानल्या जाणाऱ्या फायझर-बायोएनटेकच्य लशी संबंधी विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं की, महामारीकडे दुर्लक्ष केल्याने काही महिन्यांपूर्वी संसर्ग वाढला होता. त्यांनी नुकतेच आपले मत व्यक्त करत आपण लशीच्या विरोधात का आहोत? हे देखील सांगितले होते.

विशेष म्हणजे जेअर बोलसोनारो यांनी काही काळ अगोदरच ब्राझीलमध्ये लशीकरणासंबधी घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते की, इच्छुक असलेल्या सर्व नागरिकांना शासकीय योजनेद्वारे मोफत लस दिली जाईल. मात्र त्यांनी यावेळी हे देखील स्पष्ट केले की, आपण ही लस टोचवून घेणार नाही. वृत्तसंस्था एएफपीच्या नुसार बोल्सोनारो यांनी फायझर संबंधी हे स्पष्ट केले आहे की, ”आम्ही कोणत्याही दुष्परिणामांसाठी जबाबदार राहणार नाहीत. लस टोचवून घेतल्यानंतर जर तुम्ही मगर बनलात, तर ती तुमची समस्या असेल, आमची नाही. त्यांनी हे देखील सांगितले की जर तुम्ही सुपर ह्यूमन, जर एखाद्या महिलेस दाढी आली किंवा कुणी लहान आवाजात बोलू लागला तर याबाबत आमचं काही देणंघेणं नसेल.”

अमेरिका व ब्रिटनमध्ये अगोदरपासून या वॅक्सिनचा वापर सुरू झालेला आहे. बोल्सोनारोंनी आपला बचाव करत हे देखील सांगितले की, काही लोकांचे म्हणणे आहे मी खूप वाईट उदाहरण देतो आहे. परंतु मी अशा लोकांना सांगू इच्छितो की मला स्वतःला करोना झालेला आहे. माझ्याकडे याच्या अॅण्टीबॉडीज आहेत, तर मग याची लस का टोचवून घेतली जावी?

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचे हे विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. युजर्स देखील मोठ्याप्रमाणवर यावर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. विविध प्रकारचे फोटो शेअर केले जात आहेत. अनेकांनी मनुष्याचा चेहरा असलेल्या मगरींचा फोटो देखील टाकला आहे. काहींनी व्हिडिओ तयार करून शेअर केले आहेत. तर, अनेकांनी महिलांना दाढी आल्याचेही दाखवले आहे.