26 January 2021

News Flash

कोविशिल्ड लशीबाबत मेंदू आजाराची तक्रार

चेन्नईतील स्वयंसेवकाच्या दाव्याची चौकशी सुरू

नुकसानभरपाईपोटी पाच कोटींची तसेच चाचण्या, उत्पादनावर बंदीची मागणी

कोविड प्रतिबंधक लस टोचल्यानंतर चेन्नईतील एका व्यक्तीत गंभीर लक्षणे दिसून आल्याच्या प्रकरणी भारतीय औषध महानियंत्रक व संस्थात्मक नैतिकता समिती चौकशी करीत आहे. पुणे येथील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एसआयआय)ने तयार केलेल्या कोविशिल्ड लशीचा डोस घेतलेल्या चेन्नईतील चाळीस वर्षीय उद्योग सल्लागार स्वयंसेवकात मेंदू आजाराची गंभीर लक्षणे दिसून आली, आहेत, असे या स्वयंसेवकाने संबंधित संस्थांना जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत हा प्रकार झाला असून या व्यक्तीने पाच कोटी रुपये भरपाई मागितली आहे. या स्वयंसेवकाला मेंदूविषयक आजार व मानसिक आजाराची गंभीर लक्षणे लशीचा डोस घेतल्यानंतर आढळून आली आहेत. त्याला चेन्नई येथील श्री रामचंद्र इन्स्टिटय़ूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेत १ ऑक्टोबरला लस देण्यात आली होती. स्वयंसेवकाच्या कायदेशीर सल्लागाराने भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला नोटीस दिली असून त्यात भारताचे महाऔषध नियंत्रक, केंद्रीय औषध नियंत्रण संस्था, अ‍ॅस्ट्राझेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑक्सफर्ड लस चाचणी उपक्रमाचे प्रमुख संशोधक अँड्रय़ू पोलार्ड, श्रीरामचंद्र हायर एज्युकेशन अँड रीसर्च या संस्थेचे कुलगुरू यांनाही प्रतिवादी केले आहे.

या स्वयंसेवकाने ५ कोटी रुपये भरपाई मागितली असून लस चाचण्या, उत्पादन व वितरण यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी सांगितले की, जर संबंधित व्यक्तीमध्ये असे काही दुष्परिणाम झाले असतील व त्याचा लस देण्याशी काही संबंध असेल तर त्याची वैज्ञानिक पद्धतीने चौकशी केली जाईल. जर घाईने यात चौकशी केली तर चुकीचे निष्कर्ष हाती येतील. संस्थात्मक नैतिक समिती व महाऔषध नियंत्रक याबाबत चौकशी करतील.

११ सप्टेंबरला भारतीय औषध महानियंत्रकांनी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाला दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पुढील आदेशापर्यंत थांबवण्यास सांगितले होते, कारण ब्रिटनमधील अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीनेही एका स्वयंसेवकात वेगळ्याच आजाराची लक्षणे दिसल्यानंतर चाचण्या थांबवल्या होत्या.

अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेल्या लशीची निर्मिती भारतात सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया कोविशिल्ड नावाने करीत आहे.

१५ सप्टेंबरला सीरमला या चाचण्या पुढे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती.

२१ नोव्हेंबरला विधि आस्थापनेने दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, आमच्या अशिलास (स्वयंसेवक) भरपाई मिळाली पाहिजे. कारण त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. अजूनही सदर स्वयंसेवक गंभीर आजारातून बरा झालेला नाही. त्याच्यावर वैद्यकीय उपचार चालू असून बराच काळ ते करावे लागणार आहेत. त्यामुळे नोटिस मिळताच दोन आठवडय़ात पाच कोटी रुपये भरपाई देण्यात यावी.

मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्याचा दावा

सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोविशिल्ड लस घेतल्याने येथील चाळीस वर्षीय स्वयंसेवकाच्या मेंदू कार्यात बिघाड झाल्याचे त्याच्या तक्रारीत म्हटले आहे. सदर व्यक्तीची आकलन-बोधन क्षमता कार्येही या लशीमुळे बिघडल्याची तक्रार आहे.

या स्वयंसेवकाच्या म्हणण्यानुसार त्याला आता एन्सेफलोपॅथीचा त्रास होत असून त्याच्या मेंदूवर दुष्परिणाम झाले आहेत. लस घेतल्यानंतरच हे परिणाम झाले असून ही लस सुरक्षित नाही. त्याचा इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम म्हणजे इइजी काढण्यात आला असता त्याच्या मेंदूतील दोन्ही अर्धगोलार्धात काही प्रमाणात बिघाड झाल्याचे दिसून आले. मानसरोग मूल्यमापनात या व्यक्तीच्या बोलण्यात व दृश्य स्मृतीत बिघाड झाल्याचे दिसून आले. त्याची बोधन क्षमता आता कमी झाली आहे. त्याला मानसिक व मेंदूरोगाच्या परिणामांना सामोरे जावे लागले असल्याचे कायदेशीर नोटिशीत म्हटले आहे. कोविशिल्ड ही लस ब्रिटनमधील अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेल्या लशीचीच आवृत्ती आहे. या लशीच्या परदेशातील चाचण्यात एका स्वयंसेवकास ‘ट्रान्सव्हर्स मायलेटिस’ आजाराची लक्षणे दिसली होती. त्यात मेरुरज्जूत बिघाड होऊन तो ३ ते ६ महिने किंवा कायमही राहतो, पण हा आजार त्या व्यक्तीस लशीमुळे झाला नसल्याचे सांगून त्यावेळी काही काळ बंद केलेल्या चाचण्या पुन्हा सुरु करण्यात आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 3:02 am

Web Title: coronavirus vaccine serum institute of india mppg 94
Next Stories
1 धर्मातरविरोधी नव्या अध्यादेशानुसार उत्तर प्रदेशात पहिला गुन्हा दाखल
2 दुष्परिणामाचा दावा ‘सीरम’ने फेटाळला
3 रेल्वेत चहासाठी पुन्हा ‘कुल्हड’
Just Now!
X