करोना विषाणूवरील लस जानेवारी २०२१पर्यंत तयार होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. तसेच लस आल्यानंतर विश्वासार्हतेसाठी मीच पहिल्यांदा ती घेईन असंही त्यांनी म्हटलं आहे. सोशल मीडिया फॉलोअर्ससोबत ‘रविवार संवाद’ कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “करोनावरील लस पहिल्यांदा त्या लोकांसाठी उपलब्ध करुन दिली जाईल ज्यांना तिची सर्वाधिक गरज आहे. मग भलेही यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसले तरी चालेल. तसेच जर या लशीच्या विश्वासार्हतेवर कोणाला शंका असेल तर सर्वात आधी मलाच ती घेण्यात आनंद होईल.”

सरकार ज्येष्ठ नागरिक आणि उच्च जोखमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना कोविड-१९ च्या लशीसाठी आपत्कालीन प्राधिकरण स्थापण्याचाही विचार करीत आहे. त्याचबरोबर लशीबाबत एक विस्तृत योजना आखण्यात येत आहे. याद्वारे जास्तीत जास्त लोकांना लस कशी देण्यात येईल याबाबत प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, डॉ. हर्षवर्धन यांनी आश्वासन दिले की, “कोविडच्या लशीच्या ट्रायलदरम्यान पूर्ण सावधगिरी बाळगण्यात येत आहे. लशीची सुरक्षा, उपलब्धता, कोल्ड स्टोरेज, उत्पादनाची वेळ-काळ अशा मुद्द्यांवर देखील सखोल चर्चा केली जात आहे.”