करोनावर परिणामकारक ठरणाऱ्या दोन लसींना केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता देशात लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती पकडली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेल्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर लसीच्या वितरणाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सहा कंटेनर रवाना करण्यात आले. त्यानंतर आता १३ शहरांमध्ये लसीचे ५६.५ लाख डोस घेऊन जाण्यासाठी तीन हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची विमान सज्ज झाली आहेत.

केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याविषयी माहिती दिली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी लसीचं देशभरात वितरण सुरू झालं आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधून लस देशभरात पोहोचवली जाणार आहे. आज (१२ जानेवारी) एअर इंडिया, स्पाईसजेट आणि इंडिगो या तीन विमान कंपन्यांच्या नऊ विमानांमधून लसीचे ५६.५ लाख डोस वेगवेगळ्या शहरात पाठवण्यात येणार आहेत. यात पुण्यातून विमानं उड्डाणं भरणार असून, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा बंगळुरू, लखनौ आणि चंदीगढ या शहरात लसीचे डोस पोहोचवले जाणार आहेत.

पाहा फोटो >> ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात पुण्यातून करोना लसींचे कंटेनर निघाले

केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांच्या मदतीने लसीकरणासाठी तयारी केली असून, लसीकरण कार्यक्रमाआधी ड्राय रनही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाल्यानंतर लसीचे डोस वितरित करण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी लस घेऊन सहा कंटेनर सीरम इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडले.