करोनाचा फैलाव रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या दोन स्वदेशी लशींसह भारतात दोन परदेशी लशींच्याही मानवी चाचण्या सुरु आहेत. यात एक आहे ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाची लस तर दुसरी आहे रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ लस.ऑक्सफर्ड आणि रशियन लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष पुढच्यावर्षी येणे अपेक्षित आहे.

भारतात करोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर एकही नागरिक लशीपासून वंचित राहणार नाही. सर्वांना लस दिली जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय तज्ज्ञ गटाची स्थापना करण्यात आली आहे. हा गट देशभरात लशीचे वितरण सुनिश्चित करेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

रशियन लस अपडेट
भारतात डॉ. रेड्डी लॅबरोटरीज रशियन स्पुटनिक व्ही लशीच्या चाचण्या करणार आहे. मार्च २०२१ पर्यंत या चाचण्या पूर्ण होऊ शकतात.

पुढच्या काही आठवडयात स्पुटनिक व्ही लशीच्या चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरु होईल. डिसेंबर अखेरपर्यंत या चाचण्या पूर्ण होतील असे डॉ. रेड्डी लॅबच्या सीईओने म्हटल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

फेज तीनच्या चाचण्या लवकरात लवकर म्हणजे मार्च अखेरपर्यंत संपू शकतात. एप्रिल-मे पर्यंतही या चाचण्या चालू शकतात असे डॉ. रेड्डी लॅबच्या सीईओचे म्हणणे आहे. फेज दोनच्या चाचण्यांचा निष्कर्ष आणि यंत्रणेकडून पुढील परवानगी मिळण्यावर फेज तीन अवलंबून आहे.

ऑक्सफर्ड लस अपडेट
सिरम इन्स्टि्टयूटकडून ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या सुरु आहेत. या चाचण्या जानेवारी पर्यंत संपू शकतात असे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले. ते इंडिया टुडे टीव्हीशी बोलत होते.

“आतापर्यंत एकहजारपेक्षा जास्त लोकांना लशीचा पहिला डोस दिला आहे. भारतात एकूण १६०० लोकांवर ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी होणार आहे. आम्ही दुसरा डोस देऊ, त्यानंतर लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासू” असे अदर पूनावाला म्हणाले.