देशातील करोनाचं संकट काही प्रमाणात ओसरताना दिसत असलं, तरी सगळ्यांचंच लक्ष करोना लसीकडे लागलं आहे. सध्या तीन औषध निर्माण कंपन्यांनी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे आपातकालीन स्थितीत लसीचा वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. या तिन्ही लसींच्या संदर्भात नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी महत्त्वाची माहिती दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आज पत्रकार परिषद झाली. या परिषदेत देशातील करोना स्थिती आणि करोनावरील लसींच्यासंदर्भात माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेत बोलताना नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. पॉल म्हणाले,”दिल्लीत निर्माण झालेली करोनाची स्थिती सध्या स्थिर झाली आहे. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी विषाणूचं पाठलाग केला जात आहे. मात्र, विषाणूच आपला पाठलाग करत नाही ना, याची काळजी आपण घेण्याची गरज आहे,” असं पॉल म्हणाले.

“सध्या तीन लसींना परवानगी देण्याची प्रस्ताव विचाराधीन आहे. खूप सक्रियपणे यावर विचार केला जात आहे. तिन्ही लसींना किंवा तिन्हीपैकी एका लसीच्या बाबत लवकरच परवाना दिला जाण्याची आशा आहे,” असं डॉ. पॉल म्हणाले.

ब्रिटनने परवानगी दिल्यानंतर फायझर इंडियाने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे लसीच्या वापराला परवानगी देण्यासाठी अर्ज केला. फायझर पाठोपाठ सीरमनेही आणि भारत बायोटेकनेही अर्ज दाखल केला आहे. तिन्ही औषध निर्माण कंपन्यांनी लसीचा आपातकालीन परिस्थिती वापर करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती अर्जात केली आहे. त्यामुळे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था काय निर्णय घेणार याकडे वैद्यकीय क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.