पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्काच्या करोना लसीच्या आपात्कालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. तर दुसरीकडे ‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. ब्रिटनने या लसीला आधीच परवानगी दिली असून एखाद्या देशात परवानगी मिळालेली करोनावरची ती पहिली लस ठरली आहे. दरम्यान, यानंतर भारत बायोटेकच्या स्वदेशी ‘कोवॅक्सिन या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला आहे.

स्वदेशी करोना लस तयार ‘कोवॅक्सिन’ विकसित करणारी कंपनी भारत बायोटेकनं आपल्या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी डीजीसीआयकडे परवानगी मागितली आहे. सूत्रांद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. फायनॅन्शिअल एक्सप्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ‘कोवॅक्सिन’ ही लस भारत बायोटेक आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे (आयसीएमआर) विकसित करण्यात येत आहे. यापूर्वी ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील काही महिन्यांमध्ये करोनवरील लस तयार होणार असल्याची शक्यता वर्तवली होती.

आणखी वाचा- भारतात एका व्यक्तीच्या लसीकरणासाठी ३० मिनिटं, तीन खोल्या अन्….. समजून घ्या संपूर्ण प्लान

भारत बायोटेक, सीरम इन्स्टीट्यूट आणि फायझर या कंपन्यांद्वारे करण्यात आलेल्या अर्जांची पुढील काही दिवसांमध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टॅडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनची(सीडीएससीओ) कोविड १९ समितीद्वारे समीक्षा केली जाणार आहे. आतापर्यंत तिन्ही अर्जापैकी कोणतेही अर्ज या समितीकडे पाठवण्यात आले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. आतापर्यंत कोणतीही तारीख निश्चित करण्यात आली नाही ज्यादिवशी ही समिती या अर्जांच्या मूल्यांकनासाठी बैठक करेल.

सीरम, फायझरचा अर्ज

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्काच्या करोना लसीच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. महासाथीमुळे निर्माण झालेली वैद्यकीय गरज आणि लोकांच्या हितासाठी अशी कारणं सीरम इन्स्टिट्यूटने डीजीसीआयकडे सोपवण्यात आलेल्या अर्जात देण्यात आली आहेत.

‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला असतानाच ही माहिती समोर आली आहे. ब्रिटनने या लसीला आधीच परवानगी दिली असून एखाद्या देशात परवानगी मिळालेली करोनावरची ती पहिली लस ठरली आहे. दरम्यान सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. झायडस कॅडिलाच्या देशी करोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यांना परवानगी मिळाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज व रशियाच्या डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांनी स्पुटनिक ५ लसीची निर्मिती भारतात करण्याचे ठरवले असून त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. बायोलॉजिकल ई कंपनीने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत.