जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) करोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी भारताकडून सुरु असणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक केलं आहे. डब्लूएचओचे विशेष अधिकारी असणाऱ्या डॉ. डेव्हिड नबारो यांनी एनडीटीव्हीला मुलाखतीमध्ये भारतातील लॉकडाउनचे स्वागत केलं आहे. युरोपबरोबर अमेरिकेतील अनेक देशांनी करोनाला गांभीर्याने न घेतल्याचे चित्र दिसले तर दुसरीकडे भारताने यासंदर्भात योग्य निर्णय वेळोवेळी घेतल्याचे मत नबारो यांनी व्यक्त केलं आहे. भारत हा उष्ण प्रदेशातील देश आहे तसेच मलेरियामुळे येथील लोकांची रोगप्रतिकारकशक्ती अधिक आहे. त्यामुळेच भारतीय लोक करोनाला नक्कीच हरवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असंही नबारो म्हणाले. केंद्र सरकारने कोरनाचा संसर्ग थांबववण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचे नबारो यांनी कौतुक केल. तसेच लॉकडाउनदरम्यान लोकांना त्रास होत असला तरी कठोर निर्णयांमुळे जेवढा जास्त त्रास होईल तेवढ्या लवकर या संकटापासून भारतीयांची सुटका होईल असे मत नबारो यांनी मांडलं. त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये हाय म्हटलं आहे हे पाहुयात प्रश्न उत्तर स्वरुपामध्ये…

प्रश्न:
जगामध्ये दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारतामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांकडे तुम्ही कशापद्धतीने पाहता?

डॉ. नबारो:
सर्वात आधी या संकटाचे गांभीर्य ओळखल्याबद्दल भारतीयांचे आभार मानले पाहिजेत. या संकटाशी दोन हात करण्याची क्षमता भारताकडे आहे. भारताने यासंदर्भात काही कठोर निर्णय घेतले आहेत. लोकांना करोनाचा संसर्ग करा होतो त्यापासून आपला बचाव कसा करावा यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. भारताने वेगाने पावले उचलली याचा मला आनंद आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणेने एकत्र येत काम केलं. पंतप्रधानांपासून सर्वच मुख्यमंत्रीही चांगलं काम करत आहेत.

इतर देशांनी यासंदर्भात तातडीने निर्णय घेतले नाही. काहीच प्रकरणं समोर आल्याने हे संकट गंभीर नाही असं त्यांना वाटलं. आता अमेरिकेमध्ये त्याचे काय पडसाद उमटले आहेत हे आपण पाहतच आहोत. हेच जर भारतात झालं असतं तर काय झालं असतं याचा विचार करा. मी भारतातील लोकांना एवढचं सांगू शकतो की एकत्र येऊन तुम्हाला या संकटाचा सामना करावा लागणार आहे. यापुर्वी आपण अशाप्रकारचा शत्रू पाहिलेला नाही. आपल्या सर्वांनाच या विषाणूचा धोका आहे. आज मला संसर्ग झालेला नाही मात्र उद्या होऊ शकतो. त्यामुळेच प्रत्येकाने स्वत:च्या कुटुंबाला आणि समाजाला यापासून वाचवण्याची गरज आहे.

प्रश्न:
इटली आणि अमेरिकेमध्ये भारतापेक्षा अधिक चांगल्या आरोग्य सुविधा आहेत. मात्र तेथील सध्याची परिस्थिती गंभीर आहे. अशा वेळेस तुम्ही भारताला काय सल्ला द्या?

डॉ. नबारो:
इटली आणि अमेरिकेला करोनाचा मोठा फटका बसला आहे. कारण तेथे समाजिक स्तरावर होणारा संसर्ग अधिक प्रमाणात झाला. या देशांनी करोनाची लक्षणे दिलेल्या लोकांचे विलगीकरण केलं नाही. जर तुम्ही अशा लोकांना समाजापासून तातडीने वेगळं केलं नाही तर संकट वाढत जाणार. वेगाने निर्णय घेऊन तातडीने उपाययोजना करणे हे एकमेव उत्तर सध्या आहे. भारतामध्ये हे होताना दिसतयं ही समाधानाची बाब आहे.

प्रश्न:
करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क घालणं किती गरजेचं आहे?

डॉ. नबारो:
संसर्ग झालेल्या लोकांनी मास्क घातलचं पाहिजे. त्यांनी मास्क घातल्यास त्यांच्यामार्फत इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. संसर्ग झालेल्या व्यक्तींनी इतरांपासून कमीत कमी दोन मीटरवर उभं रहायला हवं. मात्र मास्क लावण्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी खोकताना किंवा शिंकताना काय काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

आरोग्य सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित राहणं फार महत्वाचं आहे. ते पहिल्या फळीत काम करत असल्याने ते थेट करोनाग्रस्तांच्या संपर्कात येतात. आरोग्य कर्मचाऱ्यांचे यासाठी कौतुक केलं पाहिजे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क आवश्यक वापरलं पाहिजे. या विषाणूचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. त्यामुळेच सामान्यपणे मी जास्तीत जास्त लोकांनी मास्क वापरावे असं सांगतो. आपल्याला स्थानिक पातळीवरच मास्क बनवता आले आणि जास्तीत जास्त लोकांनी वापरले तर संसर्ग थांबवण्यास मदत होऊ शकते.

मास्कबरोबर सर्वजनिक ठिकाणी खोकताना काय काळजी घ्यावी हे लोकांनी शिकण्याची गरज आहे. खोकताना तोंडावर रुमाल अथवा कापड ठेवावे. सतत हात धुणे हाच संरक्षणाचा योग्य मार्ग आहे.

नक्की वाचा >> ‘भारत करोनाविरुद्धचे युद्ध आरामात जिंकणार’; पद्म पुरस्कार विजेत्या डॉक्टराने सांगितली दोन महत्वाची कारणं

प्रश्न:
भारताची लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे अनेक लोकं लॉकडाउन झाल्याने जागोजागी अडकून पडले आहेत. अनेक लोकं धार्मिक कार्यक्रमांसाठी एकत्र येत आहे. अशा परिस्थितीमध्ये लॉकडाउन फायद्याचे ठरेल का?

डॉ. नबारो:
लोकांनी गर्दी केली, ते एकमेकांजवळ आले तरच या रोगाचा संसर्ग होतो. एखाद्या व्यक्तीमध्ये याची लक्षण दिसत नसली आणि त्याला हा आजार असला तर त्याच्या खोकण्याने आणि शिकण्याने हा आजार इतरांना होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी एकत्र येणं टाळलं पाहिजे. जर श्वास घेण्यास अडचण येत असेल तर डॉक्टरांना भेट द्या. त्याआधी लक्षणं दिसू लागताच तुम्ही चाचणी करुन घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या कुटुंबियापासूनही दूर राहिलं पाहिजे. लॉकडाउनदरम्यान आपल्या आजूबाजूच्या संक्षयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी एखादी यंत्रणा तयार करणे गरजेचे आहे.

सर्वांच्या चाचण्या घेणं कठी आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांनाही सर्व नागरिकांच्या चाचण्या घेणं शक्य नाही. त्यामुळेच करोनाच्या रुग्णांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जो संक्षयित वाटतोय त्याचं विलगीकरण करायला हवं. त्याला १४ दिवस देखरेखीखाली ठेवायला हवं. असं केल्यास संसर्गाला आळा घातला येईल आणि या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही. परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यास सरकार लॉकडाउनचे नियम शिथिल करु शकते.

लॉकडाउनचा काळ कठीण आहे याचा मला अंदाज आहे. याकाळामध्ये गरीबांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. खाण्यापिण्याच्या गोष्टींच्या किंमती वाढतात. लोकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र अशा आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून हे सर्व आवश्यक आहे हे लक्षात घ्यायला हवं. आपल्या वागण्यामध्ये बदल आणून आपण आपल्या कुटुंबाला, समाजाला या आजारापासून वाचवू शकतो.

नक्की वाचा >>“भारतामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यास घाबरण्यासारखं काही नाही; कारण एप्रिल संपेपर्यंत….”

प्रश्न:
भारतामध्ये २१ दिवसांचा लॉकडाउन पुरेसा आहे? जर हा कालावधी वाढवण्यात आला तर तो कोणत्या आधारावर वाढवण्यात येईल?

डॉ. नबारो:
लॉकडाउनचा कालावधी वाढवायचा की संपवायचा हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. किती लोकांना संसर्ग झाला आहे याच्या आधारावर लॉकडाउन कधी, कोणकोणत्या भागांमध्ये संपवायचा याचा निर्णय घेतला जातो. एखाद्या संसर्ग झालेला व्यक्ती किती लोकांना भेटला आहे यावरुन संसर्ग किती झाला असेल याचा अंदाज बांधता येतो. लॉकडाउनदरम्यान संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळेच लॉकडाउनमुळे संसर्ग थांवबण्यास फायदा होतो.

ज्या देशांमध्ये लॉकडाउनदरम्यान सापडलेल्या रुग्णांच्या संख्येवर नजर ठेऊन असतात त्यांना संसर्गाचा फैलाव होण्यापासून थांबवण्यात यश येण्याची शक्यता अधिक असते. आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहेत हे पाहूनच लॉकडाउन मागे घ्यायचा का यासंदर्भातील निर्णय घेणे फायद्याचे ठरते. आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक वस्तू मिळाल्या आहेत का, स्थानिक पातळीवर संसर्ग थांबला आहे का, तेथे सर्व गरजेच्या वस्तू उपलब्ध आहेत का याची माहिती असणे गरजेचे आहे. तसेच पंचायत, जिल्हा स्तरावरील यंत्रणांच्या मार्फत सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल जनजागृती झाली आहे का?, याचाही आठावा घेणे गरजेचे आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाल्यानंतर सर्वाधिक संसर्ग कोणत्या भागात होत आहे याची ओळख पटवता येते. जिथे संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे तिथे लॉकडाउन कायम ठेवला जातो. बाकी ठिकाणी हळूहळू सर्व सेवा पूर्ववत केल्या जातात. मात्र हे करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे.

लॉकडाउनदरम्यान अनेकांना अडचणींचा समाना करावा लागत असला तरी हा विषाणू खूप धोकादायक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही याचा परिणाम अमेरिका आणि युरोपमध्ये पाहिलाच आहे. अनेकदा सरकारे कठोर निर्णय घेताना दिसत आहेत. मला अपेक्षा आहे की भारत सरकार गरज पडेल त्याप्रमाणे कठोर निर्णय घेईल. २१ दिवसांमध्ये आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था झाली तर लॉकडाउन संपवण्यात येईल. मात्र असं नाही झालं तर करोनाशी लढण्यासाठी तयारी पूर्ण झालेली नाही असं समजावं. कोणत्याही देशामध्ये गरज नसताना अधिक काळासाठी लॉकडाउन सुरु ठेवलं जात नाही. सामान्यांबरोबरच सरकारसाठीही हा काळ त्रासदायक असतो. पण लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला तर सरकार तो निर्णय घेऊ शकते. कारण भारत सरकारने आतापर्यंत अनेक निर्णय घतले आहे. ते डब्लूएचओने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत संसर्ग थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

प्रश्न:
डब्लूएचओने अनेकदा करोनावरील निर्णयांसंदर्भात भारताचे कौतुक केलं आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यानही भारताने पोलिओ आणि देवीसारख्या रोगांना संपवल्याचा उल्लेख झाला होता.

डॉ. नबारो:
या संकटाला कसं तोंड द्यायचं हे भारतीयांना ठाऊक आहे. असं संकट आल्यावर खाण्यापिण्याच्या गोष्टींच्या किंमती वाढतात. मात्र भारतीयांना या समस्येलाही कसं तोंड द्यायचं हे ठाऊक आहे. ज्या लोकांकडे खाण्यापिण्याच्या गोष्टींची कमतरता आहे त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र जेवढ्या तातडीने पावलं उचलली जातील तेवढ्या कमी अडचणींचा समाना करावा लागेल. सरकारचं कौतुक करण्यासंदर्भात बोलायचं झालं तर जोपर्यंत आम्हाला एखाद्या देशातील सरकारने केलेले प्रयत्न दिसत नाही तोपर्यंत आम्ही कौतुक करत नाही. भारताने या संकटाला तोंड देताना तातडानी निर्णय घेण्याचे सामर्थ्य दाखवलं आहे.

प्रश्न:
भारतातील काही डॉक्टरांनी भारताला जास्त चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे. बीसीजी लसी, मलेरिया असणाऱ्या भागांमध्ये करोनाचा संसर्ग कमी होतो अशा आकडेवारीचा आधार हा दावा करताना केला जातो. तसेच भारतामध्ये आलेला करोना विषाणू हा इतर देशांच्या तुलनेत कमी शक्तीशाली आहे.

डॉ. नबारो:
आम्हाला खरोखरच अशी अपेक्षा आहे की इथे पोहचता पोहचता विषाणूची क्षमता कमी होवो. ज्या देशामध्ये उष्ण वातावरण आहे, तिथे संक्रमण होणारे आजार सामान्य आहेत अशा देशामधील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. भारतीय लोकंही त्यांच्या प्रतिकारशक्तीच्या जोरावर करोनाला हरवतील अशी आमची अपेक्षा आहे.

बीसीजी सारख्या गोष्टीमुळे लोकांमधील प्रतिकारशक्ती वाढून संसर्ग थांबवता येते याबद्दल बोलायचे झाले तर यामधूनही मदत मिळावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. या आजारामध्ये वयोगट सुद्धा महत्वाची भूमिका बजावतो. वयाबद्दल बोलायचं झालं तर करोनाचा सर्वाधिक फटका जगभरात ज्या वयोगटाला बसला आहे त्या वयोगटातील कमी लोकं भारतामध्ये आहेत.

भारत या लढ्यामध्ये यशस्वी होवो हीच आमची इच्छा आहे. मात्र केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर लढाई जिंकता येत नाही. इतर आरोग्य तज्ज्ञांप्रमाणे माझीही हिच अपेक्षा आहे की भारतातील कोरना विषाणू हा जगातील सर्वात कमी शक्तीशाली विषाणू असावा. असं असलं तरी भारताला खबरदारी घ्यायला हवी. योग्य निर्णय घेणे आणि ते अंमलात आणणे गजरेचे आहे. लॉकडाउनच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग वाढवण्याची गरज आहे. उपचारांची सर्व तयारी करुन ठेवावी लागेल. जर आपल्या अपेक्षेप्रमाणे घडलं नाही तर अचानक नव्याने तयारी करण्याऐवजी आधीच तयारी करुन ठेवणे फायद्याचे ठरेल. इतर देशांप्रमाणे आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

नक्की वाचा >> मोदी सरकारच्या ‘लॉकडाउन’च्या निर्णयाचा पहिल्याच दिवशी दिला परिणाम

प्रश्न:
अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने चीनने या विषाणूचा फैलाव होत असल्याची माहिती लवपल्याचे म्हटलं आहे. यावर तुमचे म्हणणे काय आहे. या प्रश्नांची उत्तरे समोर आली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का?

डॉ. नबारो:
हो जगाला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळालं पाहिजे. जेव्हा जेव्हा मी इतक्या वेगाने संसर्ग होणाऱ्या आजाराबद्दलची आकडेवारी पाहतो तेव्हा आपण आधीच यावर उपाय करायला हवा होता असं वाटतं. या विषणूविरोधात लढण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेतला का असा सवालही मी स्वत:ला विचारतो. मी लोकांना या विषणूविरोधाच्या लढाईमध्ये खंबीरतेने उभं राहण्याचं आवाहन केलं का? मी आयुष्यभर स्वत:ला हे प्रश्न विचारत राहणार आहे. आपण तेव्हाच असं केलं असतं तर असं वाटणं स्वाभाविक आहे. आपण योग्य वेळी कारवाई केली का? योग्य काम सुरु आहे का? यासारखे अनेक प्रश्न या संकटामधून बाहेर आल्यावर विचारता येतील. सध्या डब्लूएचओ हे प्रश्न उपस्थित करणार नाही. सध्या आम्ही आमची सर्व शक्ती आणि मदत करोना विषाणूला हरवण्यासाठी केंद्रित केलेली आहे. अशा संकटप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशामधील संबंध बिघडवणे चुकीचे आहे. हा वेळ एकेमेकांना दोष देण्याचा नाहीय. जेव्हा वेळ येईल तेव्हा याची उत्तरे आपण मिळवण्याचा प्रयत्न करुच. मात्र आता सध्या एकत्र येऊन या संकटाशी दोन हात करणे गरजेचे आहे. या संकटावर विजय मिळवणे सध्या सर्वात महत्वाचे आहे.