करोनामुळे जगभरात निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजून गंभीर होईल असा इशारा दिला आहे. जर देशांनी आरोग्याशी संबंधित पूर्वकाळजी घेतली नाही तर तर महामारी अजून गंभीर रुप धारण करेल अशी भीती टेड्रोस यांनी व्यक्त केली असून इशाराही दिला आहे. “अनेक देश चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहेत हे मला स्पष्ट करायचं आहे. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

करोना संसर्ग अद्यापही लोकांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे,” असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. जिनिवा येथे करोनासंबंधी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. “जर मुलभूत नियमांचं पालन केलं नाही तर महामारी गंभीर, गंभीर आणि अतीगंभीर रुप धारण करेल,” असं टेड्रोस यांनी सांगितलं आहे.

Coronavirus: शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका; WHO चा इशारा

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सध्या जगभरात १ कोटी ३२ लाख लोकांना करोनाची लागण झालेली आहे. तर मृतांची संख्या साडे पाच लाखांच्या पुढे गेली आहे. टेड्रोस यांनी यावेळी रविवारी २ लाख ३० हजार नवे रुग्ण मिळाले असून यामधील ८० टक्के रुग्ण १० देशांमधील असून फक्त दोन देशांमध्ये ५० टक्के रुग्ण मिळाले असल्याचं सांगितलं. अमेरिका आणि ब्राझिलला करोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने अमेरिकेसारख्या देशांमध्ये मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाउन केला जावा असा सल्ला दिला आहे. जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल. शाळा सुरु करण्यासाठी घाई केली जाऊ नये असं सांगताना जागतिक आरोग्य संघटनेने शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका असं आवाहनही केलं आहे. दरम्यान टेड्रोस यांनी यावेळी अमेरिकेकडून अद्यापही आपण जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडल्याचं अधिकृत पत्र मिळालं नसल्याचं सांगितलं आहे.