करोना व्हायरस आपोआप गायब होईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बुधवारी अमेरिकेत करोनाचे नवे ५२ हजार रुग्ण आढळले आहेत. ज्यानंतर अमेरिकेतली करोना रुग्णांची संख्या २८ लाख झाली आहे. असं असलं तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र करोना आपोआप गायब होईल असं म्हटलंय. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले ट्रम्प?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी फॉक्स न्यूजला एक मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, “मला आशा आहे की करोना आपोआप नाहीसा होईल. करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय याची कल्पना आहे तरीही मला आशा आहे की करोना गायब होईल. एवढंच नाही तर लवकरच करोनावर आम्ही लस शोधून काढू. सध्या आम्ही करोना काळ असूनही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहोत. त्यामुळे लवकरच अमेरिका सुस्थितीत असेल” असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

अमेरिकेत करोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अशात लवकरात लवकर उपाय योजना केल्या गेल्या नाहीत तर अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवू शकते असं काही वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या नागरिकांनी मास्क घातला नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही तसंच काळजी घेतली नाही तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. जर योग्य ती काळजी घेतली नाही तर येत्या काळात अमेरिकेत रोज लाखभर करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळू शकतात अशीही भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. नॅशनल इन्सिटिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजचे प्रमुख फॉसी यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

फॉसी यांनी हे देखील सांगितलं की करोनावरच्या उपायाची लस पुढील वर्षापर्यंत उपलब्ध होईल. मात्र त्याआधी जर काळजी घेतली नाही तर मोठं संकट येईल. न्यूयॉर्क, न्यूजर्सी यानंतर आता कॅलिफोर्निया, टेक्सास आणि एरिझोना या ठिकाणी करोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. अमेरिकेत करोनाचा प्रादुर्भाव रोखणं आता हाताबाहेर गेलं आहे असंही फॉसी यांनी स्पष्ट केलं आहे.