करोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा एकदा करोनाची लागण झाल्याचं चीनमध्य समोर आलं आहे. यामुळे आरोग्य अधिकारी आणि तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ६८ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला होता. पण पाच महिन्यांनी पुन्हा एकदा महिलेला करोनाची लागण झाली असल्याने चिंता वाढली आहे. ग्लोबल टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

हुबेई प्रांतातील रुग्णालयात महिला करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. महिला करोनामुक्त झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात डिस्चार्ज देण्यात आला होता. विषाणूशास्त्रज्ञांनी ग्लोबल टाइम्सशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “दुर्मिळ अशा या प्रकरणातून विषाणू शरिरातून नष्ट होण्यासाठी खूप वेळ घेत असल्याचं समोर येत आहे”. यावेळी त्यांनी करोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा लागण झालेल्या व्यक्ती संसर्गजन्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ६८ वर्षीय महिला ९ ऑगस्टला करोना पॉझिटिव्ह आढळली. सध्या तिला क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. महिलेच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली असता ते निगेटिव्ह आढळले आहेत. “या केसवरुन करोना व्हायरस शरीरातून पूर्ण नष्ट होण्यासाठी खूप वेळ घेईल हे निदर्शनास येत आहे. काही रुग्णांच्या शरीरात विषाणूंचं प्रमाण कमी असतं, यामुळेच महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असण्याची शक्यता आहे,” असं वुहान विद्यापीठातील रोगकारक जीवशास्त्र विभागाचे यांग झांकीऊ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या रिपोर्टनुसार, रुग्णांना पुन्हा करोनाची लागण होणे चीन आणि इतर देशांसाठी नवीन नाही. पण पुन्हा करोनाची लागण होण्यासाठी लागलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक कालावधी असल्याचं सागंण्यात आलं आहे.