वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात CSIR आणि अरबिंदो फार्मा लिमिटेड हे संयुक्तरित्या कोविड-१९ आजारावर लस तयार करणार आहेत. भारतातील ही तिसरी स्वदेशी लसणार आहे. मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याची घोषणा करण्यात आली.
सेंटर फॉर सेल्युलर अॅण्ड मोलेक्युलर बायोलॉजीने (CCMB) प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सीएसआयआर-सीसीएमबी आणि अरबिंदो फार्मा यांच्यामध्ये कोविड-१९ची लस तयार करण्याबाबत करार करण्यात आला आहे. दोन्हींच्या भागीदारीतून ही लस तयार करण्यात येणार आहे.
CCMB हैदराबाद, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल टेक्नॉलॉजी (IMTECH) चंदीगड आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी (IICB) कोलकाता या तीन CSIRच्या प्रयोगशाळांमध्ये विविध तांत्रिक व्यासपीठावर ही लस तयार केली जाणार आहे. तर अरबिंदो फार्मा या लसीच्या वैद्यकीय विकास आणि व्यावसायिकीकरणावर काम करणार आहे, असंही प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
CSIR आणि अरबिंदो फार्मा यांच्या भागिदारीबाबत बोलताना सीएआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले, “लस तयार करण्यासाठी सीएसआयआरच्या अव्वल दर्जाच्या प्रयोगशाळा फार्मा इंडस्ट्री सोबत एकत्र आल्यामुळे भारताच्या स्वदेशी लस निर्मिती आणि भविष्यातील महामारींविरोधात काम करण्यासाठी मदत होणार आहे.”
सीएसआयआरसोबतच्या भागीदारीपूर्वी अरबिंदो फार्मा कोविड-१९ आजारावर लस तयार करीत आहे. संपूर्ण मालकीच्या अमेरिकन सहाय्यक कंपनी ऑरो व्हॅक्सीन्सद्वारे ही लस तयार केली जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 16, 2020 9:34 am