करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये सरकारने शाळा, कॉलेज, चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर जिम, स्विमिंग पूल यांच्यासह प्रसिद्ध ठिकाणंही गर्दी होऊ नये यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने अनेक खासगी कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची सुविधा दिली आहे. पण बंगळुरुमधील एका कंपनीचा आपल्या कर्मचाऱ्यांवर अजिबात विश्वास नसल्याचं दिसत आहे.

बंगळुरुमधील कंपनीने कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची सुविधा देताना अजब अट ठेवली आहे. Shadowfax या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करताना कॅमेऱ्यासमोर बसून काम करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना काम करताना पूर्ण नऊ तास कॅमेरा सुरु ठेवूनच काम करावं लागत आहे.

कंपनीच्या या अजब अटीमुळे त्यांच्यावर ट्विटरवर टीका होत आहे.

कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीची वागणूक देणं योग्य नसून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं मत अनेकजण व्यक्त करत आहेत.