करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याआधीपासूनच देशामध्ये कंडोमचा खप ५० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त समोर आलेलं असतानाच जागतिक स्तरावर कंडोमची कमतरता भासू शकते अशी भीती आता जगातील सर्वात मोठ्या कंडोम निर्माता कंपनीने व्यक्त केली आहे. जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लॉकडाउनमुळे जगभरातील कंडोमचा पुरवठा ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यातच उपलब्ध असणारा पुरवठा हा केवळ दोन महिने टिकेल इतकाच आहे असं मलेशियातील कारेक्स बीएचडी या कंपनीने स्पष्ट केलं आहे. जगभरात बनवल्या जाणाऱ्या एकूण कंडोमपैकी प्रत्येक पाचवा कंडोम हा कारेक्स कंपनीमध्ये बनतो. त्यामुळेच या कंपनीने दिलेला इशारा हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

मलेशियामध्येही करोनामुळे लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आले. त्यानंतर कारेक्स कंपनी शुक्रवारी जवळजवळ आठवडाभरानंतर सुरु झाली. मात्र कंपनी केवळ अर्ध्या मनुष्यबळावर काम करत आहे. प्रामुख्याने भारतामध्ये आणि चीनमध्ये कंडोम बनवले जातात. दोन्ही देशांना करोनाचा जबरदस्त फटका बसला असून तेथील लॉकडाउनमुळे कंडोम निर्मितीही मंदावली आहे. त्यामुळेच कंडोमचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी भीती कंपनीने व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये कंडोमचा खप प्रचंड वाढला; विक्रेतेही चक्रावले

एकीकडे कंडोमची निर्मिती अर्ध्यावर आलेली असतानाच जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या लॉकडाउनमुळे मागणी प्रचंड वाढली आहे. अनेकजण घरीच असल्याने मात्र करोनामुळे भितीचे वातावरण असल्याने अनेकजण मुलांसाठी प्रयत्न करत नसल्याचे मत कारेक्सचे कार्यकारी अध्यक्ष गोह मिहा किएट यांनी व्यक्त केलं आहे. कारेक्स भारतामधील ड्युरेक्स या कंडोमची निर्मिती करते. तसेच ड्युरेन फ्लेवरसारखे कंपनीचे स्वत:चेही काही कंडोमचे प्रोडक्ट बाजारामध्ये आहेत. कारेक्स वर्षाला ५०० कोटी कंडोमची निर्मिती करुन ती १४० देशांमध्ये निर्यात करते. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी विमान उड्डाणे आणि व्यापारावर निर्बंध घातल्याने कंपनीसमोर निर्यात करण्यासंदर्भाती मोठे आव्हान निर्माण झालं आहे.

नक्की वाचा >> गाडीमध्ये सेक्स करताना आढळलं जोडपं, करोनासंदर्भातील सरकारी आदेश मोडल्याप्रकरणी कारवाई

“सध्याची परिस्थिती अगदीच गोंधळ निर्माण करणारी आहे. अशाप्रकारच्या अडचणीला याआधी आम्ही कधीही समोरे गेलेलो नाही,” असं गोह यांनी सांगितलं. भविष्यात कंडोम महाग होण्याची शक्यताही गोह यांनी व्यक्त केली. “करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे कंपनी बंद असून केवळ अर्धा वेळ काम होत असलं तरी आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देत आहोत. त्यामुळेच भविष्यात कंडोमच्या किंमती वाढल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असंही गोह यांनी सांगितलं.