करोना व्हायरसने अमेरिकेत थैमान घातला असून अद्यापही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. करोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत ७२ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १२ लाखाहून अधिक लोकांना लागण झाली आहे. करोनामुळे सुपर पॉवर असा उल्लेख केल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा उल्लेख करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरसचा हल्ला पर्ल हार्बर आणि ९/११ पेक्षाही भयंकर असल्याचं सांगितलं आहे.

“आम्ही आतापर्यंतच्या सर्वात वाईट परिस्थितीचा सामना करत आहोत. करोनाचा हल्ला आतापर्यंत सर्वात भयानक हल्ला आहे. पर्ल हार्बर आणि ९/११ पेक्षाही भयानक आहे. आतापर्यंत अमेरिकेवर असा हल्ला झालेला नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. करोनामुळे अमेरिकेत लॉकडाउन असून अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत.

दुसरीकडे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (आयएमएफ) आणि वर्ल्ड बँकेने अमेरिकेत आर्थिक मंदी येईल अशी शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर खाली कोसळणार असून वजा १५ ते २० टक्के असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान अमेरिकेत मृतांची संख्या थोड्या प्रमाणात कमी झाल्याने काही राज्यांनी निर्बंध शिथील करण्यास सुरुवात केली आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केला होता. ७ डिसेंबर १९४१ रोजी हा हल्ला करण्यात आला होता. सकाळी सात वाजून ५५ मिनिटांनी करण्यात आलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या १८ युद्धनौका आणि १८८ लढाऊ विमानं नष्ट करण्यात आली होती. सोबतच २४०३ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात भयानक हल्ला मानला जातो. तर ११ सप्टेंबर २००१ रोजी अल कायदाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटवर हल्ला केला होता. या हल्ल्याने अमेरिकेला हादरवून सोडलं होतं. यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा शोध घेत त्याचा खात्मा केला होता. पण करोना व्हायरसमुळे झालेलं नुकसान या दोन्ही हल्ल्यांपेक्षा मोठं असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.